सरकारकडून ओबीसी समाजाची उपेक्षा: प्रा लक्ष्मण हाके यांची टीका
जालना : काही काळापूर्वी पर्यंत केवळ शहरापूरचा मर्यादित असलेल्या भारतीय जनता पक्षाला राज्याच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाणाऱ्या इतर मागासवर्गीय समाजाला सरकारकडून व भाजपकडून तुझ्या भावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप इतर मागास प्रवर्गाचे नेते प्रा लक्ष्मण हाके यांनी केला.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी ३० तारखेपासून पुन्हा उपोषण करण्याचे जाहीर केल्यावर आमदार प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीवरही प्रा हाके यांनी टीका केली. जरांगे यांच्या मागण्या आणि आरक्षण यातील काहीही लाड यांना कळत नाही. जरांगे यांना मुख्यमंत्री, सचिव, न्यायमूर्ती भेटून गेले. तरीही त्यातून काही निष्पन्न झाले नाही, असेही ते म्हणाले.
हाके यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावरही टीका केली. आमदार प्रसाद लाड यांना एक लाख लोकांना रोजगार दिल्याबद्दल शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा , असा चिमटा त्यांनी काढला. हॉटेल चालवणारा माणूस मनोज जरांगेना भेटून फरक पडत असतो का? अशी टीका लक्ष्मण हाके यांनी प्रसाद लाड यांच्यावर केली.
ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी आम्ही ग्रामीण भागात सभा घेत आहोत. आपल्याला बजेट भेटत नाही. मात्र जरांगेंनी आंदोलन जाहीर केलं की त्यांना साडेसातशे कोटीची घोषणा होते. ओबीसींच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाकडून दुजाभाव होत आहे. जातगणना व्हावी या मागणीसाठी आम्ही शंभर सभा घेत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
