Saturday, August 29, 2026
ENTERTAINMENTLatest NewsPUNETOP NEWS

निळू फुले यांच्या हाती घ्याल ते तडीस न्या या शिकवणीने दिली पुढे जाण्याची ऊर्जा – अमृता सुभाष

पुणे : हाती घ्याल ते तडीस न्या, ही जेष्ठ अभिनेते निळू फुले यांनी दिलेल्या शिकवणूक आपण कायम लक्षात ठेवल्यामुळे आपल्याला पुढे चालण्याची ऊर्जा मिळत असल्याची भावना अभिनेत्री अमृता सुभाष यांनी शनिवारी व्यक्त केली. बेलवलकर सांस्कृतिक मंच आणि निळू फुले यांचे कुटुंबीय यांच्यातर्फे देण्यात येणारा निळू फुले कृतज्ञता सन्मान त्यांना  प्रदान करण्यात आला. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला जेष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, अभिनेते प्रसाद ओक, बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे समीर बेलवलकर, निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले आदी उपस्थित होते. या पुरस्काराचे यंदाचे चौथे वर्ष होते. गांधी टोपी, उपरणे, मानपत्र आणि २१ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी अमृता सुभाष यांच्याबरोबर समीरा गुजर जोशी यांनी संवाद साधला. अनेक पुरस्कार मिळाल्यावर आपल्याला आनंद होत असतो. मात्र, निळू फुले यांच्या नावाने मिळालेल्या  कृतज्ञता सन्मानामुळे मनातून खूपच समाधान वाटत असल्याची भावना अमृता यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.निळू फुले आणि आमचे घरोब्याचे संबंध होते. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. एकदा मी एका प्रोजेक्टवर काम करत होते. काही कारणाने तिथे वाद झाला आणि ते काम सोडून देण्याचा निर्णय मी घेतला होता. गार्गीच्या लग्नामध्ये असून देखील मला बाजूला घेवून निळू फुले यांनी मला हाती घेतलेले काम असे सोडायचे नसते, त्याचा करियरवर परिणाम होऊ शकतो. हाती घ्याल ते तडीस न्या, हा सल्ला त्यांनी दिला. त्यांची ही शिकवण मी कायम लक्षात ठेवली.

मला सतत आव्हाने स्वीकारायला आवडतात. आपण जेव्हा दिग्दर्शकाच्या भूमिकेत असतो तेव्हा शांत असतो. भविष्यकाळात आपल्याला भरपूर दिग्दर्शन करून कारकीर्द घडवायची आहे. जिथे शिकायला मिळते ते करायचे असल्याचे असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

काम करताना कंफर्ट झोन कुठेच नसावा काहीतरी पणाला लागलेले असेल तर तुमच्यातले उत्तम त्यावेळी बाहेर येते. आपण जे हार्ड वर्क करतो त्याला ग्लॅमर असले तरी रिलॅक्स होण्याला ते नाही. आपल्याला आराम हा देखील तितकाच महत्वाचा आहे. नाटक हे माझ्यासाठी औषध आहे. काही प्रयोगाच्या दरम्यान मला ताप आला तर नाटकाचा प्रयोग सुरु असताना तो उतरतो आणि नाटक संपल्यावर तो पुन्हा येतो. नाटक करताना मी कधीच दमत नसल्याचे त्या वेळी म्हणाल्या.  नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा मध्ये गेल्यावर तुला नाटकात काम केलेली माणसे भेटतील, देशातल्या विविध भाषांमधील  रंगभूमीवर काय सुरु आहे, हे समजेल असा सल्ला डॉ. श्रीराम लागू यांनी आपल्याला दिलेला मोलाचा सल्ला कामी आल्याचे त्यांनी सांगितले.

सोशल मीडियाने ट्रोल होण्याकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहायचे हे महत्वाचे असते. कलाकार कायम सॉफ्ट टार्गेट होतात.  ट्रोल होताना आपण तटस्थ राहणे योग्य ठरते, असे अमृता सुभाष यांनी सांगितले. मुलाखतीच्या शेवटी त्यांनी ” रावी के उसपार चलना ” हे गाणे सादर केले.

निळू फुले यांनी आमच्या कामाचे केलेले कौतुक हे ऑस्कर पुरस्कारासमान असल्याचे मत अभिनेते प्रसाद ओक यांनी यावेळी व्यक्त केले.

आजच्या काळात समाजात असलेले आदर्श ओळखता येणे, रोल मॉडेल्स समाजाला सांगता येणे महत्वाचे आहे. सच्चेपणाने काम करणाऱ्या कलाकारांच्या पाठीवर थाप मारण्याचे काम करण्याची जबाबदारी असल्याचे मत समीर बेलवलकर यांनी प्रास्तविकामध्ये मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading