Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

पुणे काँग्रेसला नवी उभारी देणार; दोन्ही शहराध्यक्ष सर्वांना सोबत घेऊन काम करतील: डॉ. विश्वजित कदम

पुणे :  काँग्रेसने पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी सुरू केलेल्या ‘संघटन सृजन’ अभियानांतर्गत पुणे शहरात पहिल्यांदाच पूर्व व पश्चिम असे दोन शहराध्यक्ष नेमले आहेत. हे दोन्ही नवनियुक्त शहराध्यक्ष सर्वांना सोबत घेऊन पक्षाचे काम अधिक मजबूत करतील, असा विश्वास काँग्रेसचे नेते व माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी शनिवारी व्यक्त केला. तसेच, पुण्याचे पुढील महापौर व खासदार हे काँग्रेसचेच असतील, असा दावाही नवनियुक्त शहराध्यक्षांनी या प्रसंगी केला.

नुकतीच पुणे शहर पश्चिमच्या अध्यक्षपदी माजी महापौर व माजी आमदार दीप्ती चवधरी व पुणे पूर्वच्या अध्यक्षपदी माजी महापौर प्रशांत जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दोघांनीही डॉ. कदम यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला. या पदग्रहण समारंभास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहनदादा जोशी, प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी, महानगरपालिकेतील गटनेते अॅड. रामचंद्र उर्फ चंदूशेट कदम, नगरसेविका दिपाली डोख, नगरसेविका सायरा शेख, नगरसेवक काशिफ सय्यद, नगरसेवक रफिक शेख, नगरसेवक साहिल केदारी, स्वीकृत नगरसेवक सुनील शिंदे, नगरसेविका अश्विनी लांडगे, नगरसेविका वैशाली भालेराव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. कदम म्हणाले की, ‘संघटन सृजन’ या देशव्यापी अभियानाची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आहे. केंद्रीय निरीक्षकांनी सर्वांशी सविस्तर चर्चा करून तयार केलेल्या अहवालाच्या आधारे या दोन्ही अनुभवी नेत्यांची निवड करण्यात आली आहे. चवधरी यांनी विधान परिषदेतही काम केले असून, हे दोन्ही शहराध्यक्ष पुणे काँग्रेसला निश्चितच नवी उभारी देतील. शहरातील वाहतूक कोंडी, बिघडलेली कायदा-सुव्यवस्था आणि पाणीटंचाई या सत्ताधारी भाजपच्या चुकांमुळे निर्माण झालेल्या समस्यांविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 वाढत्या गुन्हेगारीला मुख्यमंत्रीच जबाबदार

काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. कदम यांनी राज्यातील महायुती सरकारवर अत्यंत कडक शब्दांत टीका केली. पुणे शहर, जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, महिला व चिमुरड्यांवरील अत्याचार थांबलेले नाहीत, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. “राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे ही गृहमंत्रालयाची जबाबदारी असते आणि गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांकडेच असल्याने या सर्व परिस्थितीला मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत,” असा थेट आरोप त्यांनी केला. अनेक प्रकरणांमध्ये केवळ जलदगती न्यायालयांची घोषणा झाली, परंतु प्रत्यक्षात किती जणांना न्याय मिळाला, असा सवाल करत राज्य सरकार झोपले आहे की जागे, असा टोला त्यांनी लगावला.

इंधन दरवाढ आणि युवकांचा अपमान

केंद्रातील भाजप सरकारने निवडणुका संपताच पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करून सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असल्याचा आरोप डॉ. कदम यांनी केला. “आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन दरावर परिणाम होणार याची कल्पना असूनही सरकार केवळ निवडणुकांमध्ये मग्न होते आणि मतदान संपताच अवघ्या ४८ तासांत दरवाढ करण्यात आली,” असे ते म्हणाले. याशिवाय, देशातील युवा शक्तीला ‘झुरळ’ म्हणून हिणवणे हा युवकांचा अपमान आहे, असे सांगत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आणि युवक काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले.

‘नीट’ पेपरफुटीबाबत केंद्रावर निशाणा

वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीवर बोलताना डॉ. कदम यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या पेपरफुटीमुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणातील दोषींवर तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे आणि भविष्यात असा कोणताही गैरप्रकार होणार नाही, याची हमी सरकारने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
प्रारंभी काँग्रेस भवनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधीजी, स्व. इंदिराजी गांधी, स्व. यशवंतराव चव्‍हाण, हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यांस डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर कार्यक्रमाची सुरूवात सामुहिक वंदे मातरमने झाली.
याप्रसंगी पुणे पश्चिमचे अध्यक्ष दीप्ती चवधरी व पुणे पूर्वचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्यांच्या निवडीबाबत पक्षनेत्यांचे आभार मानून, पुणेकरांच्या हितासाठी कॉंग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलने करेल व आगामी काळात पुण्यात अनुकूल बदल घडवून आणेल असे म्हंटले.
कार्यक्रमास कार्यकर्त्यांने मोठी गर्दी केली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading