Sunday, April 5, 2026
BusinessLatest News

इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी  महिंद्राच्या ‘Charge_iN’चा एचपीसीएल सोबत धोरणात्मक करार

 

मुंबई : महिंद्राचे ‘Charge_iN’ आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांनी आज संपूर्ण भारतातील एचपीसीएलच्या इंधन केंद्रांवर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्रे (EVCS) उभारण्यासाठी सहयोगाची घोषणा केली. इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा विकसित करताना महिंद्राची ‘Charge_iN’ ही एचपीसीएलच्या इंधन केंद्रांच्या विस्तृत जाळ्याचा लाभ घेणार आहे. या करारामुळे इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्यांना चांगला  अनुभव मिळेल आणि भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वेगाने स्वीकार होण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.

भारतातील सरकारी मालकीच्या सर्वात मोठ्या तेल आणि वायू महामंडळांमध्ये एचपीसीएलचा समावेश होतो. देशभरात ती 24,400 हून अधिक किरकोळ विक्री केंद्रे चालवते तर ‘HP e-Charge’ या ब्रँडअंतर्गत 5,400 हून अधिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्रे संचालित करते.

हरित वाहतुकीच्या दिशेने होणारा आपला प्रवास भारताने वेगवान केला असल्याने, या कराराला महत्त्व प्राप्त झाले आहे. एचपीसीएलच्या सध्याच्या किरकोळ विक्री केंद्रांच्या विस्तृत जाळ्यामुळे, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पायाभूत सुविधांची उभारणी वेगाने करण्यासाठी आणि देशभरात या सुविधांचा अखंड विस्तार करण्यासाठी एक भक्कम मंच उपलब्ध झाला आहे.

महिंद्राचे ‘Charge_iN’ हे, अत्यंत वेगवान चार्जिंग नेटवर्क उभारून ‘इलेक्ट्रिक मोबिलिटीला अमर्याद’ (UNLIMIT) बनवण्याच्या कंपनीच्या दूरदृष्टीचा एक भाग आहे. सार्वजनिक ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाशीही ही संकल्पना सुसंगत आहे. या चार्जिंग स्टेशन्सवर केवळ 180 kW क्षमतेचे ‘ड्युएल गन चार्जर्स’ उपलब्ध असतील, जे चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांसाठी अधिक वेगवान, अधिक सोयीस्कर आणि विश्वासार्ह चार्जिंग प्रदान करण्याच्या उद्देशानेच तयार करण्यात आले आहेत.

एचपीसीएल सोबतचे हे सहकार्य, भारतात ‘Charge_iN by Mahindra’ द्वारे एक सर्वसमावेशक ईव्ही परिसंस्था उभारण्याच्या सामूहिक प्रयत्नांमधील पुढील पाऊल ठरते. जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या वाहन बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांचा व्यापक स्वीकार घडवून आणण्याचे आणि शाश्वत वाहतुकीला चालना देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, हा एक महत्त्वाचा पाया मानला जातो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading