देशभरात घरगुती एलपीजी विक्री सुरळीत सुरू
पुणे-जागतिक ऊर्जा बाजारावर चालू भौगोलिक-राजकीय परिस्थितीचा परिणाम होत असला, तरी भारतातील एलपीजी पुरवठा स्थिर, पुरेसा आणि सतत निरीक्षणाखाली आहे. घरगुती एलपीजीला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे.इंडियन ऑइलकडून घरगुती एलपीजीचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. सध्या दररोज सुमारे 28 लाख गॅस सिलिंडर वितरित केले जात आहेत, जे भौगोलिक-राजकीय तणावापूर्वीच्या नेहमीच्या पातळीप्रमाणे आहेत.ग्राहकांनी गॅस रिफिल बुक करण्यासाठी एसएमएस आणि आयव्हीआरएससारख्या डिजिटल पद्धतींचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या सुमारे 87% बुकिंग डिजिटल माध्यमातून होत आहेत. तसेच सिलिंडर योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचावा यासाठी डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (डीएसी ओटीपी) द्वारे गॅस वितरण केले जात आहे.
कॉर्पोरेशन आपल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर आलेल्या ग्राहकांच्या तक्रारींवर लक्ष देत आहे आणि त्यांना त्वरीत उत्तर देण्यास कटिबद्ध आहे. इंडेनच्या ग्राहकांनी तत्काळ मदतीसाठी indanecareho@indianoil.in या ईमेलवर संपर्क साधावा, असे सांगितले आहे. काही एलपीजी वितरकांच्या गैरप्रकारांबाबत सोशल मीडिया आणि ग्राहकांच्या तक्रारींमधून माहिती मिळाली आहे. काळा बाजार आणि साठेबाजी टाळण्यासाठी अनेक क्रॉस-फंक्शनल टीम्सना एलपीजी वितरकांकडे अचानक तपासणी करण्यासाठी पाठवले गेले आहे. आतापर्यंत 7,500 पेक्षा जास्त तपासण्या करण्यात आल्या असून, 141 एलपीजी वितरकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे, ज्यात 5 वितरकांना निलंबित करण्यात आले आहे.
इंडियन ऑइल आणि इतर तेल विपणन कंपन्या राज्य सरकारांसोबत मिळून गैरप्रकार टाळण्यासाठी आणि साठेबाजी रोखण्यासाठी काम करत आहेत. आतापर्यंत सुमारे 68,000 छापे टाकले गेले, 855 एफआयआर नोंदवल्या गेल्या आणि 48,000 हून अधिक सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.इंडियन ऑइल सर्व इंडेन ग्राहकांना सांगते की देशात एलपीजी पुरवठा पर्याप्त आणि सुरळीत आहे, कुठलाही तुटवडा नाही. ग्राहकांनी एलपीजी वितरकांच्या रांगा लावू नयेत आणि घाईघाईत बुकिंग किंवा सिलिंडर साठवू नयेत. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये आणि फक्त अधिकृत माहितीवर अवलंबून राहावे.इंडियन ऑइल एलपीजी पुरवठा अखंड ठेवण्यास, वितरणात पारदर्शकता राखण्यास आणि गैरप्रकारांविरुद्ध कडक कारवाई करण्यास पूर्णपणे कटिबद्ध आहे.
