Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी एक कोटींची तरतूद

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महामाता रमाई यांनी केवळ एका समाजासाठी कार्य केले नाही तर सर्व मानव जातीसाठी कार्य केले. प्रत्येकाचे आयुष्य प्रकाशमान होईल यादृष्टीने प्रयत्न केले. पुण्यातील सर्व जनेताचा विकास व्हावा असा आमचाही सामूहिक प्रयत्न असेल, अशी ग्वाही महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिला.

महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी महापालिकेने अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातर्फे महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांचा आज (दि. ३) नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी महापौर नागपुरे बोलत होत्या. सत्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आला. रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर होते. तर कार्यक्रमाचे संयोजक विठ्ठल गायकवाड, लता राजगुरू यांची उपस्थिती होती.

कर्तव्याच्या भावनेतून महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी निधी मंजूर केल्याचे सांगून महापौर मंजुषा नागपुरे पुढे म्हणाल्या, सामाजिक कार्य करताना कौतुक स्वीकारणे योग्य वाटत नाही. समाजहितासाठी कार्य करत रहावे याच भावनेने आमचे प्रयत्न आहेत.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, लोकशाहीच्या विकासासाठी संवाद महत्त्वाचा असतो, त्याच भूमिकेतून महापौर, उपमहापौर वाटचाल करीत आहेत याचा मनस्वी आनंद आहे. त्यांच्या कारकिर्दीतील विकासाचे पर्व महत्त्वाचे ठरणार आहे.

उपमहापौर परशुराम वाडेकर म्हणाले, शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या, कष्टप्रद जीवन जगणाऱ्या कुटुंबातून आलो आहे. माझीही वाटचाल कष्टातूनच झाली आहे. भविष्यातील वाटचाल सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठीच राहणार आहे.

स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले म्हणाले, स्मारकाच्या विकासासाठी निधी देण्याची संधी मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. कर्तव्याच्या भावनेतूनच कार्य करत राहणार आहे.

महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या उपक्रमांची माहिती ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले तर आभार लता राजगुरू यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading