शास्त्रीय गायन आणि पखवाज वादनाने २८ व्या कलाश्री संगीत महोत्सवाला सुरुवात
पुणे : युवा, आश्वासक शास्त्रीय गायक अभयसिंह वाघचौरे यांचे सुमधुर शास्त्रीय गायन आणि पं. नानासाहेब पानसे यांच्या पखवाज घराण्याचे युवा पखवाज वादक कृष्णा साळुंखे यांचे दमदार पखवाज वादन याने आज २८ व्या कलाश्री संगीत महोत्सवाचा श्रीगणेशा झाला.
गुरुकुल कलाश्री संगीत मंडळ यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा कलाश्री संगीत महोत्सव यावर्षी रविवार दि. ५ एप्रिल पर्यंत आयोजित करण्यात आला असून पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे तो संपन्न होत आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला व विनामूल्य आहे.
आज महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार शंकरभाऊ जगताप, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक प्रशांत शितोळे, चंद्ररंग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य लक्ष्मण जगताप, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विजू शेठ जगताप, गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. सुधाकर चव्हाण, कलाश्रीचे विश्वस्त सच्चिदानंद कुलकर्णी, पिंपरी चिंचवडमधील संतपिठाचे संचालक राजू महाराज ढोरे, प्रसिद्ध बासरीवादक दीपक भानुसे, प्रसिद्ध गायक पं रघुनाथ खंडाळकर, वास्तू उद्योजक अजित घुले आदी मान्यवर उपस्थित होते.
संगीत नसते तर आपल्या सर्वांचे जीवन ओसाड असते. आयुष्यात संगीत हे हवेची हळुवार झुळूक घेऊन येण्याचे काम करते असे सांगत आमदार शंकर जगताप म्हणाले, “ही समाधानाची झुळूक पिंपरी चिंचवड शहरात आणण्याचे काम पं. सुधाकर चव्हाण आणि कलाश्री संगीत मंडळाने केले आहे, याबद्दल आम्ही रसिक त्यांचे ऋणी आहोत. आपले पंतप्रधान देखील कायमच संस्कृतीला आणि संगीताला चालना देण्याचे काम करत असतात, आणि म्हणूनच त्यांनी विकास दिनासोबतच विरासत दिन देखील साजरा करायला सुरुवात केली आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा कलागुणांना प्रोत्साहन देणारे मुख्यमंत्री आहेत. आपल्या शहरात कै. लक्ष्मण जगताप यांनी कोरोना काळात कलाकारांवर ओढावलेले संकट लक्षात घेत स्टेजवरील आणि स्टेजमागील कलाकारांना मदतीचा हात दिला होता. ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, नटसम्राट निळू फुले नाट्यगृह उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. या पुढील काळात आम्ही देखील संस्कृतीला चालना देण्याचे काम असेच सुरु ठेऊ.”
काळाच्या ओघात मागे पडत चाललेले अखिल भारतीय शास्त्रीय संगीत कलाश्री महोत्सवांसारख्या महोत्सवाच्या माध्यमातून पुन्हा एकदा रसिकांना अनुभविता येत आहे याचा आम्हाला आनंद आहे. आपल्या जीवनात सप्तसूर आणण्याचे काम हे संगीत करते. मानसिक त्रास कमी करायचा असेल तर प्रत्येकाने शास्त्रीय संगीताकडे वळावे त्यामुळे तुम्हाला डॉक्टरची देखील गरज लागणार नाही असेही जगताप यांनी नमूद केले.
राधानंद व कलाश्री संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या गायन व वादनाच्या कार्यक्रमाने आजच्या महोत्सवाच्या पहिल्या दिवसाला सुरुवात झाली. राधानंद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कायदा आणि पढंतचे सादरीकरण केले, त्यांना आदित्य पवार यांनी संवादिनीवर साथसंगत केली. यानंतर कलाश्री संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तीन समूहामध्ये गायन प्रस्तुती केली. यावेळी राग पटदीप, राग भीमपालास आणि राग पुरिया कल्याण यांचे सादरीकरण त्यांनी केले. याबरोबरच सरस्वती वंदनाही सादर केली. या विद्यार्थ्यांना श्रवणी पोटले यांनी संवादिनी तर स्मितीश कुर्वे यांनी तबल्यावर साथ केली.
यानंतर युवा, आश्वासक शास्त्रीय गायक अभयसिंह वाघचौरे यांचे शास्त्रीय गायन रंगले. अभयसिंह यांनी राग पुरिया धनश्री प्रस्तुत केला. यामध्ये त्यांनी विलंबित एक तालात ‘अब तो ऋतु मान आये…’ ही बंदिश, ‘पायलिया झनकार मोरी…’ हा छोटा ख्याल गायला. ‘याद पियां की आयें…’ या त्यांनी सादर केलेल्या लोकप्रिय ठुमरीला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. अभयसिंह वाघचौरे यांना हरिभाऊ असतकर यांनी संवादिनी, चेतन ताम्हणकर यांनी तबलासाथ तर आयुष सोनावणे, रवी पांचाळ व ईशान भंडारी यांनी तानपुरा व गायनसाथ केली.
यानंतर कृष्णा साळुंखे यांच्या पखवाजवादनाने महोत्सवाचा माहौल बदलवित उपस्थितांना पखवाज वादनाची एक वेगळी झलक दाखवून दिली. त्यांनी आज सादरीकरणासाठी राग आदिताल निवडला. प्रस्ताराने त्यांनी आपल्या वादानाला सुरुवात केली. यानंतर शिवपरण सादर करीत एक वेगळीच उर्जा निर्माण केली. काही रेले आणि विविध जती या तांत्रिक व लयकारीच्या महत्त्वाच्या प्रकारांच्या सादरीकरणाने त्यांनी विराम घेतला. साळुंखे यांना यशवंत थिट्टे यांनी पूरक अशी संवादिनीसाथ केली
२८ व्या कलाश्री संगीत महोत्सवाचा समारोप संगीत मार्तंड पं. जसराज यांच्या शिष्या असलेल्या अंकिता जोशी यांच्या गायनाने झाला. अंकिता यांनी राग दरबारी कानडा आणि राग हंसध्वनी गायला. राग दरबारी कानडा मध्ये त्यांनी ताल झपतालामध्ये ‘असी दरबारी गुणीजन गावे…’ ही रचना गायली. यानंतर तीनतालात ‘बनवारी बनायके गए…’ आणि ‘मान जा मोरे पिया…’ या एकतालातील रचना प्रस्तुत केल्या. यानंतर राग हंसध्वनीमध्ये अंकिता यांनी ‘पवन पूत हनुमान लला…’ ही रचना गायली. ‘नाम गाऊ…’ या अभंगाने त्यांनी महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप केला. अंकिता यांना प्रशांत पांडव (तबला), अभिनय रवंदे (संवादिनी), भाग्यश्री टोमके, तेजल कोठावळे, मानसी महाजन यांनी तानपुरासाथ केली. नामदेव तळपे यांनी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सूत्रसंचालन केले.
