Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने महिला दिनी महिलांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन

विविधतेतील एकता हा भारताचा मानबिंदू: उपमहापौर परशुराम वाडेकर

पुणे :

भारत हा विविधतेने नटलेला देश असून विविधतेतील एकता हा भारताचा मानबिंदू आहे. तो जोपासण्यासाठी सर्व समाज घटकांनी एकमेकांच्या सुखदुःखात सणसमारंभात सहभागी होऊन समाधानाने एकत्र राहावे, असे आवाहन उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी केले.

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने महिला दिनी खास मुस्लिम महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, आरपीआयचे शिवाजीनगर मतदारसंघ अध्यक्ष अविनाश कदम, अॅड. ज्ञानेश्वर जाविर, शहाबुद्दीन काझी, सादिक शेख, मुजीब बुखारी, जुबेर पीरजादे, समीर मणियार, फारुख शेख, अली अब्बास कादरी, इब्राहिम सय्यद आदि उपस्थित होते.

भारतात हिंदू, मुस्लिम, मागासवर्गीय, आदिवासी अशा विविध धर्मपंथांचे लोक आनंदाने एकत्र राहतात. भारतीय संविधानाने प्रत्येकाला समान दर्जा दिलेला आहे. भारतीय समाज मानवता धर्म मानणारा, शांतता प्रिय. त्यामुळे सर्वांनी समाधानाने एकत्र राहणे अपेक्षित आहे, असे वाडेकर यांनी नमूद केले. प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत सर्वांनी सद्भावनेने व सलोख्याने राहावे, असेही ते म्हणाले.

रमजान हा पवित्र महिना मानला जातो. मात्र, या महिन्यात जगात निर्माण झालेली युद्ध परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन होऊच शकत नाही, असेही वाडेकर म्हणाले.

दरमहा केलेल्या कामांचा मांडणार लेखाजोखा

मी आंबेडकरी चळवळीतून पुढे आलेला कार्यकर्ता आहे. समाजातील अपप्रवृत्तींशी संघर्ष करत आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लढे उभारत उपमहापौर पदापर्यंत पोहोचलो आहे. आपल्या पदाचा वापर करून शहरातील सर्व नागरिकांचे जीवन सुलभ आणि समाधानी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अल्पसंख्याक समाजाच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न करणार आहे, असेही वाडेकर यांनी स्पष्ट केली. प्रत्येक महिन्यात आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading