Sunday, November 15, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘विलीनीकरणाच्या चर्चांचा मला कंटाळा’; सुप्रिया सुळेंनी विषयाला दिला पूर्णविराम


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणावरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना खासदार सुप्रिया सुळे यांनी आता स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला आहे. या विषयावर वारंवार चर्चा करण्याचा कंटाळा आल्याचे सांगत यापुढे विलीनीकरणाबाबत कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या निधनानंतर आमच्यासाठी विलीनीकरणाचा विषय संपला असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “तुम्हाला या विलीनीकरणाच्या चर्चांचा कंटाळा आला नसेल, पण मला मात्र कंटाळा आला आहे. दादा, आमचे नेते आणि राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांमध्ये विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती. त्यासाठी तारीखही निश्चित झाली होती, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, माझा भाऊ दादा गेल्यानंतर आम्ही या चर्चांना पूर्णविराम दिला.”

अजित पवार गटामध्ये विलीनीकरणाबाबत काय चर्चा सुरू आहेत, याच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या गटातील नेत्यांच्या विधानांवर आम्ही प्रतिक्रिया देत नाही, असे सांगत त्यांनी या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले.
अजित पवार यांच्याशी असलेल्या कौटुंबिक नात्याविषयी बोलताना सुप्रिया सुळे भावूक झाल्या. माझे आणि दादांचे नाते अतिशय जवळचे होते. आमच्यातील प्रेम आणि जिव्हाळा कायम राहील, असे त्यांनी सांगितले.

राज्यात महागाई, दुष्काळ आणि धोरणात्मक निर्णयांसारखे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यावर चर्चा होणे आवश्यक असताना वारंवार विलीनीकरणाच्याच विषयावर प्रश्न विचारले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. आज या विषयावर जे काही विचारायचे आहे ते विचारा; मात्र यापुढे मी यावर बोलणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आपला पक्ष सत्तेत सहभागी होणार नसल्याची भूमिकाही सुप्रिया सुळे यांनी पुन्हा मांडली. लोकशाहीवर आमचा विश्वास असून त्याच मार्गाने आम्ही राजकारण करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना सुप्रिया सुळे यांच्या या विधानामुळे नवे वळण मिळाले आहे. विलीनीकरणाच्या शक्यतेबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांपासून आपल्या पक्षाची भूमिका वेगळी असल्याचा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे.

Leave a Reply