Saturday, November 14, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

राज ठाकरे आणि काँग्रेसच्या राजकारणाला उतरती कळा; छठ पूजेच्या वादावरून मनोज तिवारींचा हल्लाबोल


मुंबई : छठ पूजेच्या गाण्यांवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. रेल्वे स्थानकांवर छठ पूजेची गाणी वाजवण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केल्यानंतर आता भाजपचे खासदार आणि भोजपुरी अभिनेते मनोज तिवारी यांनी या वादात उडी घेतली आहे. राज ठाकरे आणि काँग्रेसच्या भूमिकेवर टीका करताना अशा प्रकारच्या राजकारणामुळेच त्यांची राजकीय ताकद कमी होत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
राज ठाकरे आणि काँग्रेसकडून होत असलेल्या विरोधावर प्रतिक्रिया देताना मनोज तिवारी म्हणाले की, अशा भूमिकांमुळे संबंधित नेत्यांचे राजकीय पतन होत आहे. महाराष्ट्रात त्यांच्या बोलण्याला कोण महत्त्व देत आहे, असा सवाल करत मराठी माणूसही त्यांना गांभीर्याने घ्यायला तयार नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या राजकीय अधोगतीला त्यांची स्वतःची कृतीच कारणीभूत असल्याचेही तिवारी यांनी म्हटले.
दुसरीकडे, मनोज तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचे छठ पूजेच्या आयोजनाबद्दल कौतुक केले. छठ महापर्वासाठी सरकार आणि प्रशासनाकडून चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस हे स्वतः छठ पर्वाचे श्रद्धाळू असून व्रत करणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व व्यवस्था केल्या जात असल्याचेही तिवारी म्हणाले.
दरम्यान, छठ पूजेनिमित्त उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या स्वागतासाठी रेल्वे स्थानकांवर छठ पूजेची गाणी लावण्यात आली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयावर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेतला. गाणी वाजवणे बंद न केल्यास मनसेच्या पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशाराही मनसेकडून देण्यात आला होता.
या वादानंतर राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. उत्तर प्रदेशातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रात जाणीवपूर्वक वाद निर्माण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप धर्म आणि जातीच्या आधारे समाजात फूट पाडण्याचे राजकारण करत असल्याची टीका करत त्यांनी भाजपच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणावरही निशाणा साधला.
छठ पूजेच्या गाण्यांवरून सुरू झालेला हा वाद आता मराठी अस्मिता, धार्मिक उत्सव आणि भाजपविरोधातील राजकीय संघर्ष अशा विविध मुद्द्यांशी जोडला गेला असून, मनोज तिवारी यांच्या टीकेमुळे या राजकीय संघर्षाला आणखी धार आली आहे.

Leave a Reply