Friday, November 13, 2026
ENTERTAINMENTLatest News

भक्तांच्या श्रद्धेपोटी स्वामींची दिव्य लीला! नवविवाहित भक्तांना घडणार अलौकिक दर्शन!

कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत गावातील सामाजिक भेदभाव आणि जुनाट विचारांच्या विळख्यात अडकलेल्या शंकर आणि रुही या नवविवाहित जोडप्याला केवळ त्यांच्या प्रेमविवाहामुळे गावातील महादेव मंदिरात प्रवेश नाकारला जातो. मार्तंड आपल्या कपटी कारस्थानातून या दोघांचा अपमान करून स्वामींच्या भक्तांना आणि त्यांच्या विचारांना आव्हान देण्याचा डाव आखतो. देवाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या या जोडप्याला मंदिराच्या दारातूनच अपमानित होऊन माघारी फिरावं लागतं. मात्र, स्वामींच्या दृष्टीने देव कधीही मंदिराच्या चार भिंतींमध्ये बंदिस्त नसतो. तो चराचरात, प्रत्येक जीवात वास करतो, हीच शिकवण स्वामी आपल्या भक्तांना देतात.

मंदिरात प्रवेश नाकारला म्हणून देवापासून दूर जाता येत नाही, हे पटवून देण्यासाठी स्वामी शंकर आणि रुहीला एका अनोख्या अनुभूतीची प्रचिती देतात. मंदिराच्या बाहेरच त्यांना हवेचं महत्त्व समजावून सांगताना, जसं जगण्यासाठी हवा सर्वत्र आहे, तसाच परमेश्वरही सर्वत्र व्यापलेला आहे, याची जाणीव करून देतात. स्वामींच्या चरणी श्रद्धेने केलेल्या अभिषेकाच्या वेळी बेलपत्रातून दिव्य प्रकाश प्रकट होतो आणि क्षणार्धात शंकर-रुहीला स्वामींच्या जागी दिव्य साक्षात्कार घडतो, या अलौकिक दर्शनाने दोघेही भारावून जातात. त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळतात आणि स्वामींच्या कृपेने त्यांच्या श्रद्धेला जणू पूर्णत्व प्राप्त होतं. भक्तांच्या मनातील चुकीच्या संकल्पना दूर करणारा हा क्षण अनुभवायला विसरू नका. १४-१५ नोव्हेंबर ह्या भागात तो पाहायला मिळणार.

मात्र, स्वामींच्या या दिव्य लीलेने भक्तांच्या मनात समाधानाची ज्योत प्रज्वलित झाली असली, तरी मार्तंडाच्या कपटी कारस्थानांचा अंत झालेला नाही. शंकरला कामाच्या निमित्ताने जाळ्यात अडकवण्यापासून ते त्याची आणि रुहीची बदनामी करण्यापर्यंत मार्तंडने नवा डाव आखला आहे. स्वामींच्या विचारांचा दीप विझवण्यासाठी तो कोणत्या थराला जाणार? आपल्या भक्तांचा अपमान आणि छळ स्वामी कसा सहन करतील? शंकर-रुहीच्या पाठीशी स्वामी कोणत्या रूपात उभे राहणार? महादेवाच्या दर्शनाची त्यांची इच्छा पूर्ण होणार की मार्तंड आपल्या कारस्थानात यशस्वी होऊन स्वामींच्या भक्तांना पुन्हा एकदा दुःखाच्या खाईत लोटणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे!

Leave a Reply