गर्भाशयाच्या कर्करोगाची मोफत तपासणी शिबीर संपन्न
रत्नागिरी – महिलांच्या आरोग्यसेवेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत, महिलांसाठी गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची मोफत एचपीव्ही डीएनए चाचणी कार्यक्रम परकार हॉस्पिटल, रत्नागिरी येथे नुकताच संपन्न झाला. पुण्यातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क व त्यांच्या इनक्यूबेटी कंपनी आयुजेन बायोसायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील २००० ग्रामीण महिलांसाठी गर्भाशयाच्या कर्करोग जागरूकता आणि तपासणी कार्यक्रम यशस्वीरित्या राबविला आहे.
महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल)च्या एमजीएल आरोग्य कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या या उपक्रमाचा उद्देश वंचित समुदायांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे लवकर निदान आणि प्रतिबंध करण्यास प्रोत्साहन देणे होता. 30 वर्षे व त्या पेक्षा जास्त वयावरील महिलांची एचपीव्ही टेस्ट करण्यात आली. या टेस्टने गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंधक करता येतो. ही टेस्ट करण्यासाठी 3 हजार रुपये खर्च असतो. एचपीव्ही टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या महिलांची मोफत प्राथमिक उपचार परकार हॉस्पिटल रत्नागिरी येथे करण्यात आली. तसेच हे शिबिर चिरा मेडोज इको रिसॉर्ट, ओम साई नगर, आयटीआय जवळ, दाभोळ रोड, जालगाव, दापोली येथे देखील आयोजित करण्यात आले होते.
महानगर गॅस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आशु सिंघल आणि सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी पार्क पुणेचे महासंचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
यावेळी परकार हॉस्पिटलच्या डॉ. शुभांगी बेडेकर, डॉ. अनुराधा लेले, आयुजेन बायोसायन्सेसचे आयुजेन बायोसायन्सेसचे विपणन व्यवस्थापक अभय वैद्य, तसेच कॅम्प आयोजक व इतर मान्यवर उपस्थित होते.
भारतातील महिलांना होणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग आहे, ज्यामध्ये ३५ ते ५० वयोगटातील महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागात या प्रतिबंध करता येण्याजोग्या आजाराचे प्रमाण सर्वाधिक आहे. दरवर्षी, भारतात गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगामुळे जवळजवळ १,३०,००० नवीन रुग्ण आणि ७४,००० मृत्यू होतात. सुरुवातीच्या टप्प्यात त्याचे विशेष लक्षणे नसलेले स्वरूप पाहता, मृत्युदर कमी करण्यासाठी स्क्रीनिंग कार्यक्रमांद्वारे लवकर निदान करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे यावेळी उपस्थित डॉक्टरांनी सांगितले.
