Monday, April 27, 2026
BusinessLatest NewsPUNE

पुण्यातील संस्थेचा राष्ट्रीय स्तरावर बिल्ड इंडिया पुरस्काराने सन्मान

पुणे  : रस्ते बांधणी व पायाभूत सोयीसुविधांचा विकास या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पुण्यातील राजपथ इन्फ्राकॉन या संस्थेने सलग एकाच मोहिमेत, चार गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स करण्याचा पहिलाच विश्वविक्रम केल्याबद्दल बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्ड्ने त्यांना राष्ट्रीय स्तरावर सन्मानित केले आहे.

नुकतेच दिल्ली एनसीआर येथे झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राजपथ इन्फ्राकॉनच्या कार्यकारी संचालिका मोहना कदम यांनी हा सन्मान स्वीकारला. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष राघव चंद्रा, प्रायमस पार्टनरचे दविंदर सिंह, आर्यन आणि अर्णव कदम आदी देखील यावेळी उपस्थित होते. बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्ड्च्या ट्रेलब्लेजिंग प्रोजेक्ट विभागात राजपथ इन्फ्राकॉनच्या नवोन्मेष, अभियांत्रिकी उत्कृष्टता आणि दृढनिश्चयी टीमवर्कची दखल घेत त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

राजपथ इन्फ्राकॉन या संस्थेच्या वतीने ५ ते ११ जानेवारी, २०२६ दरम्यान एकूण चार गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड्स प्रस्थापित करण्यात आली होते. यामध्ये आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थीजवळ २४ तासांत सलगपणे टाकण्यात आलेला बिटुमिनस काँक्रीटचा सर्वांत लांब पट्टा (९.६३२ किमी, ३ पदरी) म्हणजेच २८. ८९ किमी एक पदरी रस्ता, २४ तासांत टाकण्यात आलेले बिटुमिनस काँक्रीटचे सर्वाधिक प्रमाण (१०,६५७ मेट्रिक टन), सलगपणे टाकण्यात आलेला बिटुमिनस काँक्रीटचा सर्वात लांब (५२.४१ किमी, तीन पदरी ) पट्टा, म्हणजेच १५७ किमी एक पदरी आणि सलगपणे टाकलेल्या बिटुमिनस काँक्रीटचा सर्वाधिक प्रमाण (५७, ९८२ मेट्रिक टन) या विक्रमांचा समावेश आहे.

मागील तीन दशकांहून अधिक काळ देशभरातील महत्त्वाचे आणि जटील असे पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्याचा अनुभव राजपथ इन्फ्राकॉनच्या पाठीशी असून नवीन पायाभूत सुविधांचे बेंचमार्क स्थापित करण्याच्या आणि दररोज उंची वाढवण्याच्या आमच्या वचनबद्धतेला या पुरस्काराने बळकटी मिळाली असल्याचे राजपथ इन्फ्राकॉनच्या संचालिका मोहना कदम यांनी सांगितले.

देशातील पायाभूत सुविधांच्या विकासातील उत्कृष्टतेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच   नवोपक्रम, शाश्वतता आणि सामाजिक परिणामांना प्रोत्साहन देणे, त्यांना नवीन बेंचमार्क स्थापित करण्यासाठी प्रेरित करणे हा बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्ड्सचा मुख्य हेतू असून या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या परीक्षणानंतर वेगवेगळ्या श्रेणीतील बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्ड्स दरवर्षी देण्यात येत असतात. सदर वर्ष हे या पुरस्कारांचे तिसरे वर्ष होते. पुरस्कारांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading