फोटोग्राफर्स@पुणे च्या वतीने ‘दृष्टीकोन २०२६ – हॅप्पी लेन्स’ प्रदर्शनाचे आयोजन
पुणे : आजच्या अविरत धावणाऱ्या डिजटल युगात मानवी नात्यांमधील ओलावा आणि साधेपणा शोधण्यासाठी ‘फोटोग्राफर्स एॅट पुणे’ (P@P) या समूहाच्या वतीने येत्या २७ फेब्रुवारी ते १ मार्च, २०२६ दरम्यान ‘दृष्टीकोन २०२६ – हॅप्पी लेन्स’ या तीन दिवसीय भव्य प्रकाशचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शन हे या समूहाचे ११ वे भव्य प्रकाशचित्र प्रदर्शन असून घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा कलादालनात ते संपन्न होईल. तीनही दिवस सकाळी ११:०० ते सायंकाळी ७:०० या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
दृष्टीकोन २०२६ – हॅपी लेन्स या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रख्यात संगीतकार, गायक डॉ. सलील कुलकर्णी यांच्या उपस्थितीत शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी, २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता, घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा कलादालनात संपन्न होईल, अशी माहिती आयोजकांनी कळविली आहे.
प्रदर्शनाविषयी अधिक माहिती देताना आयोजक म्हणाले की, २०२३ – २४ मध्ये सुरू झालेला ‘हॅप्पी लेन्स’ हा प्रकल्प एका मूलभूत प्रश्नातून जन्माला आला. आनंद नेमका कसा दिसतो? हा तो प्रश्न होता. आजच्या धकाधकीच्या आणि नकारात्मकतेने भरलेल्या जगात, मानवी जिद्द आणि निखळ हास्य टिपण्यासाठी P@P च्या प्रकाश चित्रकारांनी दोन वर्षे अथक परिश्रम घेतले. केवळ दुरून फोटो न काढता, समोरच्या व्यक्तीशी संवाद साधून, त्यांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण समजून घेण्याचा प्रयत्न प्रकाश चित्रकारांनी केला.
पुण्याच्या गजबजलेल्या पेठा, बाजारपेठांपासून ते दुर्गम खेड्यांपर्यंत आणि प्रवासातील शांत कोपऱ्यांपर्यंत जिथे जिथे माणूस आहे, तिथे तिथे ‘आनंद’ शोधण्याचे काम या प्रकल्पाने केले आहे. हजारो प्रकाशचित्रांमधून निवडक आणि बोलकी चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. आजच्या वेगवान आणि धकाधकीच्या युगात, ‘हॅप्पी लेन्स’ हे केवळ एक प्रदर्शन नसून, मानवी नात्यांमधील ओलावा आणि आपल्या अवतीभवती असलेल्या निखळ आनंदाची जाणीव करून देणारा एक जिवंत आरसा आहे, असेही आयोजकांनी आवर्जून नमूद केले.
याबरोबरच आपल्या ११ व्या प्रदर्शनासह P@P ने आपली सामाजिक कार्याची परंपरा अधिक भक्कम केली असून गेल्या १० प्रदर्शनांप्रमाणेच याही वर्षी प्रदर्शनातून जमा होणाऱ्या निधीचा एक भाग ‘विद्या महामंडळ’ या संस्थेतील विशेष मुलांच्या शिक्षणासाठी वापरला जाणार आहे. केवळ कला सादर करणे नव्हे, तर त्यातून समाजाचे ऋण फेडणे हा या समूहाचा मुख्य उद्देश आहे हे विशेष.
