Saturday, April 18, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पं. हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद अमजद अली खान होणार पहिल्या उस्ताद ज़ाकीर हुसैन एक्सलन्स पुरस्काराचे मानकरी

प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान

पुणे : कला क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तींचा सन्मान करण्याच्या उद्देशाने पुण्यातील तालचक्र ट्रस्ट या संस्थेच्या वतीने उस्ताद ज़ाकीर हुसैन एक्सलन्स पुरस्कार देण्यात येणार आहेत. पद्मविभूषण उस्ताद ज़ाकीर हुसैन यांच्या ७५ व्या जयंतीचे औचित्य साधत येत्या ९ मार्च रोजी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सायं. ७ वाजता आयोजित करण्यात येणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतील. हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुला असेल व त्यासंबंधीची माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल.

रुपये १ लाख व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून ज्येष्ठ बासरीवादक पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांना २०२५ च्या तर ज्येष्ठ सरोदवादक पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान यांना २०२६ च्या उस्ताद ज़ाकीर हुसैन एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रसिद्ध गीतकार व लेखक जावेद अख्तर यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतील, अशी माहिती सुप्रसिद्ध तबलावादक व तालचक्र ट्रस्टचे विश्वस्त पद्मश्री पं. विजय घाटे यांनी दिली.

गेली १२ वर्षे तालवाद्यांना समर्पित असलेला तालचक्र संगीत महोत्सव आम्ही आयोजित करत आहोत. त्यामुळे माझे प्रेरणास्थान असलेल्या तालसम्राट उस्ताद ज़ाकीर हुसैन यांच्यासारख्या थोर कलाकाराच्या स्मृतीमध्ये एक चांगला उपक्रम राबवावा असे मनात होते आणि त्यातूनच ही पुरस्काराची संकल्पना पुढे आली. उस्ताद ज़ाकीर हुसैन यांचे चतुरस्त्र व्यक्तीमत्व पाहता सदर पुरस्काराची व्याप्ती फक्त संगीत क्षेत्रापुरती मर्यादित न ठेवता येत्या काळात या पुरस्काराच्या माध्यमातून कला क्षेत्रातील विविध शाखांमध्ये मोठे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा आमचा मानस आहे, असे पं. घाटे म्हणाले.

पुरस्कार वितरण समारंभात एक विशेष सांगीतिक कार्यक्रम सादर करण्यात येईल. या कार्यक्रमाची संकल्पना १९९८ साली आलेल्या सई परांजपे दिग्दर्शित ‘साज’ या चित्रपटातील गोरख कल्याण रागावर आधारित असलेल्या ‘फिर भोर भाई जागा मधुबन…’ या गाण्यावर असेल. सदर गाणे जावेद अख्तर यांनी लिहिले असून, उस्ताद ज़ाकीर हुसैन यांनी संगीतबद्ध केले व विदुषी देवकी पंडित यांनी ते गायले होते.

या सांगीतिक कार्यक्रमात अमर ओक (बासरी), ताकाहीरो अराई (संतूर), कृष्णा साळुंखे व ओंकार दळवी (पखवाज), नितीन सातव (जेंबे), सुरंजन खंडाळकर (गायन), यशवंत थिट्टे (संवादिनी), शीतल कोलवालकर (कथक), सागर पटोकर (साईड रिदम) आदी कलाकार सहभागी होतील. कार्यक्रमाच्या शेवटी स्वतः विदुषी देवकी पंडित हे गाणे रसिकांपुढे सादर करतील. विशेष म्हणजे या कार्यक्रमात तबल्याचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही. उस्ताद ज़ाकीर हुसैन यांच्या सारखे तबलावादन कोणीच करू शकत नाही ही भावना अधोरेखित करण्याच्या हा एक प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांच्या जयंतीला सादर होणाऱ्या या कार्यक्रमात तबला नसेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading