राज ठाकरे यांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट
कल्याण डोंबिवली महापालिकेत सहकार्याची ग्वाही
ठाणे प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेने शिवसेना शिंदे गटाला मदत केल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या आभार मानले. राज ठाकरे यांनी महापालिकेच्या कारभारात आपल्या पक्षाची शिवसेनेला मदत असेल, अशी ग्वाही शिंदे यांना दिली.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे यांची शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरली. महापौर पदाच्या निवडणुकीत मनसेने शिवसेना शिंदे गटाला मदत केली. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरही कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना विरुद्ध शिवसेना या लढाईत राज ठाकरे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला मदत केल्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर आणि त्यांच्या पक्षावर आगपाखड केली होती. आज राज ठाकरे यांनी शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याने ठाकरे गटाच्या नेत्यांचे कान टवकारले आहेत.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मात्र आपल्या पक्षात अस्वस्थता असल्याचा इन्कार केला. राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आहेत आणि एकनाथ शिंदे हे आमचे विरोधक असले तरीही राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. एका पक्षप्रमुखांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना भेटण्यात काहीच गैर नाही. त्याचे राजकीय अर्थ काढू नयेत, असे अंधारे म्हणाल्या.
