मुस्लिम आरक्षणासाठी मौलानांनी उतरावे रस्त्यावर
इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली अपेक्षा
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
ऐन निवडणुकीच्या वेळी घराबाहेर येऊन समाजाला विशिष्ट पक्ष किंवा उमेदवाराला मतदान करण्याचे सल्ले देणाऱ्या मौलानांनी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहाद उल मुसलमीन पक्षाचे नेते व माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.
आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गात मुस्लिम समाजाला दिले जाणारे पाच टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाबद्दल बोलताना जलील यांनी मुस्लिम समाजातील मौलाना आणि प्रभावशाली व्यक्तींना लक्ष्य केले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिला होता. ब्राह्मण समाजातही सर्व श्रीमंत लोक आहेत असे नाही. ब्राह्मणांमध्येही शिकण्याची इच्छा आहे पण आर्थिक परिस्थिती नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यांनाही आरक्षण मिळावे अशी आमची भूमिका आहे. तीच परिस्थिती मुस्लिम समाजाची आहे. त्यामुळे उत्पन्नाचे स्त्रोत विचारात घेऊन आरक्षण मिळावे अशी आमची भूमिका आहे.
मुस्लिम समाजातील प्रभावशाली लोक, विशेषतः मौलाना फक्त निवडणुकीच्या काळात विशेष सक्रिय होतात. ते का सक्रिय होतात हे सर्वांनाच माहित आहे. आता आपले याच मौलानांना आवाहन आहे की त्यांनी मुस्लिमांचे आरक्षण टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरावे. तसे झाले तर आम्हीही मागे राहणार नाही. अन्यथा समाजाच्या हितासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलने करायची आणि निवडणुकीच्या वेळी या मौलाना वर्गाने दुसऱ्याच कुणालातरी मते मिळवून देण्यासाठी आपल्या प्रभावाचा वापर करायचा, अशी टीकाही जलील यांनी केली.
