अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स अमेरिकेला पाठवणार
प्रफुल्ल पटेल यांनी दिली माहिती
मुंबई प्रतिनिधी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूचे कारण ठरलेल्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स त्यातील माहिती मिळवण्यासाठी अमेरिकेला पाठवणार असल्याची माहिती आपल्याला विमान तपास ब्युरोकडून मिळाली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अपघाताचा तपास योग्य दिशेने सुरू आहे की नाही, सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे की नाही याची नियमित माहिती आम्हाला मिळणे आवश्यक आहे, असेही पटेल म्हणाले.
महाराष्ट्र सरकारने या अपघाताच्या चौकशीची जबाबदारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे अर्थात सीआयडीकडे दिली होती. मात्र, या अपघाताची सर्व पैलूतून चौकशी होणे गरजेचे आहे. कोणी घातपाताचा संशय व्यक्त करत असेल किंवा निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली असेल तर त्या दृष्टीने देखील तपास होणे आवश्यक असल्यामुळेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आपल्या पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या अपघाताच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे निवेदन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पाठवून त्याबाबत पाठपुरावा करू, अशी ग्वाही दिली आहे, असेही पटेल यांनी सांगितले.
