देहविक्रय करणाऱ्या अकरा बांगलादेशी महिला पोलिसांच्या ताब्यात
बुधवार पेठेत धडक कारवाई, दलालांना कडक इशारा
पुणे प्रतिनिधी
पोलिसांनी बुधवार पेठेत धडक कारवाई करून देहविक्रय करणाऱ्या अकरा बांगलादेशी महिलांसह 22 जणांना ताब्यात घेतले आहे. या महिलांना त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
बनावट आधार कार्ड आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे या महिलांना बांगलादेशातून येथे आणण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. यासाठी मदत करणारे आणि त्यांना देहविक्रय करायला लावणारे दलाल आणि कुंटणखाना चालवणाऱ्यांवरही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. खबरीने दिलेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली.
यापूर्वी 11 फेब्रुवारी रोजी देखील पोलिसांनी या परिसरात कोंबिंग ऑपरेशन केले होते. त्यात तब्बल 700 जणांची चौकशी करण्यात आली. या कारवाईत केवळ दोन बांगलादेशी महिला सापडल्या. मात्र, यावेळी चार अल्पवयीन मुलींची पोलिसांनी सुटका केली. तसेच या कारवाईत अमली पदार्थही सापडले.
