Saturday, April 4, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

वैमानिकाने मुद्दाम आदळले विमान, रोहित पवार यांचा आरोप

 

मुंबई  : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार प्रवास करीत असलेले विमान खुद्द वैमानिकानेच मुद्दाम जमिनीवर आदळले, असा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी दादांच्या विमानाचा अपघात नव्हे तर घातपात असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार केला. या कथित कटाची राजकीय पार्श्वभूमी देखील त्यांनी पत्रकार परिषदेत कथन केली.

मुळात मुंबईहून विमानाचे उड्डाण होताना दृश्यमानता कमी होती. तरी दखील विमानाला उड्डाण करण्यास परवानगी देण्यात आली. विमान जमिनीवर उतरताना बारामतीतील दृश्यमानता साडेतीन हजार एवढी होती. विमान उतरवण्यासाठी किमान दृश्यमानता 5000 एवढी असावी लागते. तरी देखील विमान उतरवण्यात आले.

विमानाचा जमिनीवर आपटताना मोठा स्फोट आणि आगडोंब व्हावा हा देखील कटाचा भाग असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. मुंबई ते बारामती प्रवासाला मोठ्या प्रमाणावर इंधनाची आवश्यकता नसताना देखील विमानामध्ये तब्बल साडेतीन हजार लिटर इंधन भरण्यात आले होते. याशिवाय अतिरिक्त इंधन विमानातील स्वच्छतागृहाबाहेर ठेवण्यात आले होते, असा आरोपही रोहित पवार यांनी केला.

वैमानिक सुमित कपूर यांच्याबरोबरच खाजगी विमान वाहतूक कंपनी व्हीआरएसवर देखील रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. कंपनीचा गोपी नावाचा एक व्यवस्थापक मुंबईत कंपनीचे कामकाज बघतो. त्याच्याकडून विमानांचे नियोजन केले जाते. या गोपीनेच दादांच्या विमानाबाबत नियोजनात फेरफार केला असावा, असा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला. याबाबत सध्या चौकशी सुरू असून कंपनीकडून पुराव्यांमध्ये फेरफार करण्यासाठी कागदपत्र उपलब्ध करून देण्यास विलंब लावला जात आहे, असा दावाही त्यांनी केला.

या कथित कटामागची राजकीय पार्श्वभूमी देखील रोहित पवार यांनी स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार होते. दोन्ही गट एकत्र आल्यानंतर एक तर आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीत जाऊन सत्तेत सहभागी झालो असतो. हे न आवडणारा एक गट होता तर आमच्याबरोबर येऊन अजित पवार राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडले असते आणि सर्वसामान्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढले असते. हे देखील न आवडणारा एक गट होता. ही राजकीय पार्श्वभूमी अजित पवार यांच्या कथित हत्येच्या कटामागे असू शकते, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading