Saturday, October 3, 2026
Latest NewsPUNE

सुख मिळण्यासाठी भगवंताची प्राप्ती आवश्यक – ह.भ.प. केशव महाराज नामदास

पुणे : भगवंताने भक्ती करण्याचे ज्ञान फक्त मनुष्यालाच दिले आहे. मनुष्य देहामध्येच भगवंताची उपासना, भक्ती आणि उद्धाराचे ज्ञान प्राप्त होऊ शकते. मनुष्य जन्म हा भक्ती करण्यासाठी मिळाला असूनही त्याचे साध्य करून घ्यावे, असे अनेकांना वाटत नाही. प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा असते. सुख प्राप्त करून घ्यायचे असेल, तर भगवंताची प्राप्ती आवश्यक आहे, असे प्रतिपादन पंढरपूर येथील संत नामदेव महाराज यांचे १६ वे वंशज ह.भ.प. केशव महाराज नामदास यांनी केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सेंट्रल पार्क येथे चातुर्मासानिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ९ आॅगस्ट पर्यंत हा महोत्सव सुरु असून दररोज सायंकाळी ५.३० वाजता महाराष्ट्राच्या विविध भागांतील नामवंत कीर्तनकारांना ऐकण्याची व यामाध्यमातून स्वरब्रह्माची अनुभूती घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

ह.भ.प. केशव महाराज नामदास म्हणाले, आजकाल संसार करणारी माणसे जास्त, तर परमार्थ करणारे लोक कमी दिसतात. प्रत्येकजण संसार सुखाचा व्हावा म्हणून रात्रंदिवस धडपड करत असतो. कोणी नोकरी, कोणी व्यवसाय, तर कोणी शेतीमध्ये प्रयत्न करत असतो. प्रत्येकाची धडपड संसार सुखाचा व्हावा यासाठीच सुरू असते. मात्र संसारातच खरे सुख असते, तर सर्वजण समाधानी झाले असते.

शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी जगद्गुरु फाऊंडेशनचे संस्थापक जगद्गुरुकृपांकित ह.भ.प. डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. महोत्सवाचा समारोप रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी ह.भ.प. भावार्थ महाराज देखणे यांच्या भारुडाने होणार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतील नामवंत कीर्तनकारांना ऐकण्याची आणि स्वरब्रह्माची अनुभूती घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. महोत्सवाला प्रवेश खुला असून पुणेकरांनी या कीर्तनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading