डॉ.शर्वरी इनामदार यांची कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड
पाच राष्ट्रीय विक्रम, आठ सुवर्णपदके आणि नवव्यांदा ‘स्ट्रॉंग वुमन ऑफ इंडिया’ किताब
पुणे : छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत डॉ. शर्वरी इनामदार यांनी उल्लेखनीय कामगिरी करत पाच नवीन राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली. आठ सुवर्णपदके जिंकत त्यांनी स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले. या स्पर्धेतून त्यांची सप्टेंबर २०२६ मध्ये कॅनडातील विनीपेग येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग आणि बेंचप्रेस स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
देशभरातील विविध राज्यांतील सुमारे ८०० हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. मास्टर-१, ५७ किलो महिला गटातील क्लासिक प्रकारात डॉ. इनामदार यांनी स्क्वॉट, बेंचप्रेस आणि डेडलिफ्टमध्ये एकूण ३६७.५ किलो वजन उचलले. तसेच इक्विप्ड प्रकारात त्यांनी विक्रमी ४२२ किलो वजन उचलून पाच नवीन राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली.
या स्पर्धेत त्यांनी एकूण आठ सुवर्णपदके पटकावली. तसेच ‘बेस्ट लिफ्टर ऑफ इंडिया’ अर्थात ‘स्ट्रॉंग वुमन ऑफ इंडिया’ हा मानाचा किताब त्यांनी सलग नवव्यांदा आपल्या नावावर केला. तेलंगणा, दिल्ली, केरळ, मध्य प्रदेश, मणिपूर, ओडिशा, बिहार, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकसह विविध राज्यांतील खेळाडूंमध्ये त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली.
डॉ. शर्वरी इनामदार या ‘कोड ब्रेकर’ व्यायामशाळेत नियमित सराव करतात. तसेच ‘आहार आयुर्वेद’ क्लिनिकमध्ये रुग्णांसह खेळाडूंना आहार व आरोग्य विषयक मार्गदर्शनही करतात.
