विमान अपघाताबाबत पारदर्शक चौकशी व्हावी ही महाराष्ट्राची इच्छा
सत्य समोर येण्याबाबत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला विश्वास
पुणे प्रतिनिधी
आमच्या घरात जे घडले ते इथून पुढे कोणाच्याही बाबतीत घडू नये या तळमळीनेच रोहित पवार हे अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अभ्यासपूर्ण रीतीने पाठपुरावा करीत आहेत. या घटनेमागील सत्य समोर यावे. त्यासाठी याची पारदर्शकपणे चौकशी व्हावी ही केवळ आमचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. या घटनेमागील सत्य निश्चितपणे समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अजित पवार यांच्या दुर्घटनेचे आम्हाला राजकारण करायचे नाही. आमच्या घरातील कर्ता पुरुष गेला हा राजकारणाचा विषय होऊ शकत नाही. मात्र, या दुर्घटनेबाबत रोज नवनवीन माहिती पुढे येत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात विविध शंका उपस्थित होत आहेत. त्याचे निराकरण व्हावे यासाठी पारदर्शक चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
… राम कृष्ण हरी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणात अडथळा येत आहे का, या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी ‘राम कृष्ण हरी,’ या शब्दात उत्तर दिले. ज्याच्या बरोबर चर्चा झाल्या तो आमचा भाऊच आता राहिलेला नाही तर त्यावर काय बोलायचे? दादा मोकळ्या स्वभावाचा होता. अनेक पत्रकारांशी अनौपचारिक रित्या बोलताना त्यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली होती. तोच आता हयात नसताना कशाला कुणाची उणी दुणी काढायची? आता पूर्ण क्षमतेने कामाला लागणे हीच दादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले. मात्र, स्थानिक पातळीवर आम्ही एकमेकांना सहकार्य करू, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार का, या प्रश्नाचे थेट उत्तर देणे सुप्रिया सुळे यांनी टाळले. मात्र, याबाबत महाविकास आघाडी म्हणून आम्ही चर्चा करू. लवकरच महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. त्यामध्ये राज्यसभेच्या जागेबाबत चर्चा होणे अपेक्षित आहे, असे सुळे यांनी स्पष्ट केले.
