Friday, August 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

प्रदेशाध्यक्ष बदलल्याखेरीज राष्ट्रवादीसाठी काम करणे अशक्य – प्रशांत किशोर

 

मुंबई प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी आपण काम करणे अपेक्षित असेल तर प्रदेशाध्यक्ष बदलण्याशिवाय पर्याय नाही. यापूर्वीच्या तीन बैठकांमध्ये स्पष्ट कल्पना देऊनही पक्षाने त्या दृष्टीने कोणतीही पावले उचललेली नाहीत, अशी स्पष्टोक्ती निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केली आहे.

बिहारमधील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केल्यानंतर किशोर यांनी तिसऱ्याच दिवशी मुंबई येथे उपमुख्यमंत्री आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. सुमित्रा पवार, पार्थ पवार आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये तब्बल सहा तास बंद दाराआड बैठक पार पडली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी व्यूहरचना आखण्याचे काम प्रशांत किशोर यांनी करावे, अशी सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांची इच्छा आहे. त्यासाठी यापूर्वीही बैठका पार पडल्या. मात्र, पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबरोबर काम करणे आपल्याला शक्य नाही, असे यापूर्वीच प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले आहे. काल पार पडलेल्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबत सुनेत्रा पवार यांना निकराची सूचना केली आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्यानंतर काही काळातच पक्षाचे दोन ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात धुसफूस सुरू झाली. सुनेत्रा पवार यांना नाममात्र नेतृत्व देऊन पक्षाचा कारभार आपल्या हाती घेण्याचा या दोघांचा प्रयत्न असल्याची चर्चा पक्षांतर्गतच सुरू झाली. या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी दिलेला प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा आग्रही सल्ला सुनेत्रा पवार अमलात आणणार का, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading