खडकी रेल्वे स्थानकाजवळ भुयारी मार्ग उभारण्याची उपमहापौर परशुराम वाडेकर यांची मागणी
पुणे : खडकी रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी रेल्वे फाटकाजवळ नवीन प्रशस्त भुयारी मार्ग (अंडरपास) उभारण्याची मागणी उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पुणे महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी केली आहे. तसेच या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) यांनाही निवेदन देण्यात आले आहे.
या बाबत संबंधितांना दिलेल्या पत्रात उपमहापौर वाडेकर यांनी म्हटले आहे की, खडकी रेल्वे स्थानक हे सध्या महत्त्वाचे जंक्शन झाले असून दररोज अनेक एक्स्प्रेस गाड्या येथे थांबतात. अलीकडे उत्तर भारतात जाणाऱ्या काही रेल्वेगाड्या या पुणे स्टेशन ऐवजी खडकी येथून सोडल्या जात आहेत त्यामुळे स्थानक परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. रेल्वे स्थानकाजवळील जुने रेल्वे फाटक बंद असताना औंध, सांगवी, बाणेर, बोपोडी, खडकी बाजार आदी भागांतून ये-जा करणाऱ्या हजारो नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.
खडकी पोलिस स्टेशनजवळील जुना रेल्वे बोगदा अत्यंत अरुंद असून या मार्गावर सतत पाणी साचत असल्याने वाहतुकीस मोठ्या अडचणी निर्माण होतात. वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता हा बोगदा दुरुस्त करूनही वाहतुकीची समस्या कायम राहण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर खडकी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटकाच्या ठिकाणी नवीन प्रशस्त भुयारी मार्ग उभारण्यासाठी तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी, तसेच रेल्वे प्रशासनास पत्र पाठवून संयुक्त पाहणी करावी, अशी मागणी वाडेकर यांनी केली आहे. या कामासाठी आवश्यक अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.
