Saturday, August 8, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी; व्हॉइस नोटची मुंबई पोलिसांकडून चौकशी

मुंबई प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार झिशान सिद्दीकी यांना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हॉइस नोटमधून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा समोर आला आहे. ही धमकी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील फरार आरोपी आणि कथित सूत्रधार झिशान अख्तर याने दिल्याचे सांगितले जात असून, या प्रकरणाची मुंबई गुन्हे शाखेकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.

व्हायरल झालेल्या ऑडिओ संदेशात बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला असून, झिशान सिद्दीकी यांनाही अशाच परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच सुरक्षा वाढवूनही काही फरक पडणार नसल्याचे या संदेशात म्हटल्याची चर्चा आहे.

मुंबई पोलिसांनी या व्हॉइस नोटची सत्यता पडताळण्यासाठी तांत्रिक तपास सुरू केला असून, ऑडिओचा स्रोत आणि त्यामागील व्यक्तीची ओळख निश्चित करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, झिशान सिद्दीकी किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
झिशान सिद्दीकी सध्या परदेशात असून, ते भारतात परतल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. तपासाच्या निष्कर्षानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading