Saturday, October 3, 2026
Latest NewsPUNE

राजकारणापलीकडचा काश्मीर जगासमोर; डॉ. वैदेही तामन यांच्या पाच ग्रंथांतून आध्यात्मिक वारशाचा वेध

पुणे – काश्मीरचा उल्लेख प्रामुख्याने राजकारण, सुरक्षा आणि समकालीन घडामोडींच्या संदर्भात होत असला, तरी या भूमीचा समृद्ध आध्यात्मिक, साहित्यिक आणि बौद्धिक वारसा तितकाच महत्त्वाचा आहे. याच वारशाचा संशोधनातून वेध घेत महाराष्ट्रातील पत्रकार, लेखिका आणि संशोधक डॉ. वैदेही तामन यांनी काश्मीरच्या सांस्कृतिक इतिहासावर पाच विशेष ग्रंथ लिहिले आहेत. त्यांच्या या संशोधनामुळे लाल डेड, आचार्य अभिनवगुप्त आणि काश्मीरच्या प्राचीन परंपरांकडे नव्याने लक्ष वेधले गेले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. तामन यांनी काश्मीर खोऱ्यात प्रवास करून तेथील इतिहास, साहित्य, तत्त्वज्ञान, परंपरा आणि आध्यात्मिक वारशाचा अभ्यास केला. मुख्य प्रवाहातील चर्चेत तुलनेने कमी अधोरेखित होणाऱ्या या पैलूंना त्यांनी आपल्या लेखनातून व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या ग्रंथांमध्ये “लाल डेड  काश्मीरची माता”,  “अभिनवगुप्त – शाश्वत शिवाचा आवाज” तसेच नीलमत पुराणावरील संशोधनाचा समावेश आहे. या ग्रंथांच्या माध्यमातून काश्मीरच्या प्राचीन परंपरा, तत्त्वज्ञान, पवित्र भूगोल आणि आध्यात्मिक इतिहासाचा मागोवा घेण्यात आला आहे.

काश्मीरच्या संत-कवयित्री लाल डेड यांच्या जीवनकार्यावर आधारित डॉ. तामन यांचे लेखन विशेष उल्लेखनीय ठरले आहे. त्याचबरोबर आचार्य अभिनवगुप्त यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या त्यांच्या ग्रंथातून काश्मीर शैव परंपरेतील समृद्ध विचारविश्व समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

डॉ. तामन यांच्या मते, काश्मीरकडे केवळ वर्तमानातील घटनांच्या चौकटीतून पाहता कामा नये. काश्मीरचा प्राचीन आध्यात्मिक आणि सांस्कृतिक इतिहास पुढील पिढ्यांसाठी जतन होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने संशोधन आणि ग्रंथलेखनाच्या माध्यमातून हा वारसा दस्तावेजबद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. श्रीनगर येथे आयोजित लाल डेड साहित्य पुरस्कार सोहळ्यात, जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या उपस्थितीत डॉ. वैदेही तामन यांच्या लाल डेड  काश्मीरची माता या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

गुलशन बुक्स, काश्मीर यांनी प्रकाशित केलेल्या त्यांच्या ग्रंथांमुळे काश्मीरच्या साहित्यिक, तात्त्विक आणि आध्यात्मिक वारशावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
डिजिटल युगात माहिती वेगाने प्रसारित होत असताना ती तितक्याच वेगाने विस्मृतीत जाण्याची शक्यताही असते. अशा काळात संशोधन, दस्तावेजीकरण आणि ग्रंथलेखनाच्या माध्यमातून सांस्कृतिक स्मृती जतन करण्याचा मार्ग डॉ. वैदेही तामन यांनी स्वीकारला आहे. त्यांच्या पाच ग्रंथांमधून काश्मीरच्या प्राचीन सांस्कृतिक आणि वैचारिक वारशाचा अभ्यास करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साहित्यिक स्रोत उपलब्ध झाला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading