गायन आणि तबलावादनाच्या सुरेल मैफलीने रंगला १३ व्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचा पहिला दिवस
पुणे : भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या समृद्ध संगीत परंपरेला अभिवादन करणाऱ्या १३ व्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ झाला. गुरुकुल कलाश्री संगीत मंडळ आणि द औंध सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, महोत्सवाचे आयोजक आणि द औंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजित गायकवाड, अजित गायकवाड, गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका व द औंध सोशल फाउंडेशनच्या उपाद्धय्क्षा भक्ती गायकवाड, द औंध सोशल फाउंडेशनचे सचिव शिरीष नाईकरे, भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी, स्वयंभू फाऊंडेशनच्या सुजाता सिद्धार्थ शिरोळे, आनंद छाजेड यांसोबत विविध मान्यवर, कलाकार आणि संगीतप्रेमी उपस्थित होते.
यानंतर उस्ताद अक्रम खान आणि जरघम खान यांच्या तबला जुगलबंदीने मैफलीत रंगत आणली. अजराडा घराण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण कायदा, रेला आणि गत यांची त्रितालातील प्रस्तुती तसेच रूपक तालातील सादरीकरणातून तबलावादनाचे विविध पैलू रसिकांना अनुभवता आले. हार्मोनियमवर नीलय साळवी यांनी साथसंगत केली.
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता दीपिका भिडे यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग मालकंस सादर करून रसिकांची मने जिंकली. त्यानंतर भैरवीतील ‘तुज पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी’ या भजनाने त्यांच्या सादरीकरणाची सांगता झाली. त्यांना हार्मोनियमवर अभिनय रवंदे आणि तबल्यावर प्रणव गुरव यांनी साथ केली.
