Saturday, October 3, 2026
Latest NewsPUNE

पुणे महानगरपालिका आणि आनंदवन फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम; पुण्यात ६,५०० वृक्षांची लागवड, कोथरूड डीपी रोडचा मार्ग मोकळा

पुणे, : पुणे महानगरपालिका (PMC) आणि आनंदवन फाउंडेशन यांनी संयुक्तपणे वृक्षारोपण व पुनर्रोपणाचा उपक्रम हाती घेतला असून, या अंतर्गत पुण्यात ६,५०० नवीन वृक्षांची लागवड आणि ५०० विद्यमान वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.

आनंदवन फाउंडेशनने आपल्या देखरेखीखाली असलेल्या सर्व्हे नं. १८ येवलेवाडी येथील ७ हेक्टर जागेवर वृक्षारोपण व पुनर्रोपणाचे काम करण्यासाठी पुणे महानगरपालिकेला संमती दिली आहे. वृक्षारोपण व पुनर्रोपण झाल्यानंतर या वृक्षांची देखभाल आणि संवर्धनाची जबाबदारीही पुणे महानगरपालिकेकडे राहणार आहे. या संमतीपत्राची प्रत उपवनसंरक्षक, पुणे यांनाही देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे कोथरूडमधील प्रस्तावित ग. अ. कुलकर्णी पथ ते कर्वे पुतळा डीपी रोड प्रकल्पाशी संबंधित पर्यावरणीय उपाययोजनांना मदत होणार असून, या महत्त्वाच्या रस्त्याच्या पुढील प्रक्रियेचा मार्ग मोकळा होण्यास मदत होणार आहे.

परिसरातील अंतर्गत दळणवळण अधिक सुलभ करणे तसेच सध्याच्या प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करणे या उद्देशाने हा नवीन रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे काही वृक्ष बाधित होणार असून, त्यापैकी पुनर्रोपणासाठी योग्य असलेल्या वृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. त्याचबरोबर निश्चित करण्यात आलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणावर नवीन वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.

यास दुजोरा देत पुणे महानगरपालिका पथविभागाचे अधिकारी राजेश बनकर, यांनी सांगितले की, “प्रस्तावित कर्वे पुतळा रस्ता जोडणीचा उद्देश कोथरूडमधील अंतर्गत दळणवळण सुधारण्याचा तसेच सध्याच्या रस्ते आणि चौकांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्याचा आहे. पुनर्विकास आणि वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर हा अतिरिक्त मार्ग स्थानिक वाहतुकीचे अधिक प्रभावीपणे विभाजन करण्यास आणि परिसरातील ‘लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी’ सुधारण्यास मदत करेल. पुणे शहराचा विकास होत असताना पायाभूत सुविधांचा विकास आणि पर्यावरणीय जबाबदारी या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे पुढे नेणे आवश्यक आहे.”

ते पुढे म्हणाले, “वृक्षारोपण आणि पुनर्रोपण कार्यक्रमासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही आनंदवन फाउंडेशनचे आभार मानतो. या जागेमुळे हे काम नियोजनबद्ध पद्धतीने करता येईल. वृक्षांची लागवड केल्यानंतर त्यांची योग्य देखभाल आणि संवर्धन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. पुणे महानगरपालिका या वृक्षांच्या दीर्घकालीन देखभालीची जबाबदारी पार पाडेल.”

आनंदवन फाउंडेशनचे संस्थापक सचिव भूपेश शर्मा म्हणाले, “वृक्षारोपण आणि पुनर्रोपणासाठी निश्चित करण्यात आलेली जागा पुणे महानगरपालिकेला उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे. या उपक्रमामुळे पुण्याच्या हरित क्षेत्रात अर्थपूर्ण भर पडेल आणि योग्य दीर्घकालीन देखभालीमुळे हा उपक्रम शाश्वत ठरेल, अशी आम्हाला आशा आहे.”

कोथरूड परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास झाला असून, त्यामुळे लोकसंख्येची घनता आणि वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. या परिसरातील बहुतांश अंतर्गत रस्त्यांचे जाळे वाहतुकीचे प्रमाण तुलनेने कमी असताना विकसित करण्यात आले होते. प्रस्तावित नवीन रस्ता जोडणीमुळे परिसराला आणखी एक अंतर्गत पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. त्यामुळे स्थानिक वाहतुकीचे अधिक प्रभावीपणे विभाजन होऊन परिसरातील वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होईल.

हा रस्ता पुण्यात विस्तारत असलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही पूरक ठरेल. यामध्ये नळ स्टॉप ते वारजे आणि माणिकबागपर्यंत प्रस्तावित पुणे मेट्रोच्या नवीन ४अ विस्ताराचाही समावेश आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading