Friday, August 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘शिंदे डबल गेम करत आहेत’; मनोज जरांगे पाटील यांचा पहिल्यांदाच थेट हल्लाबोल, सरकारवर गंभीर आरोप

मुंबई  : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रथमच थेट आणि अत्यंत आक्रमक शब्दांत टीका करत, ते मराठा समाजाच्या प्रश्नावर “डबल गेम” खेळत असल्याचा गंभीर आरोप केला. कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याच्या निर्णयामागे शिंदे यांचाच हात असल्याचा दावा करत त्यांनी सरकारवरही जोरदार निशाणा साधला. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे म्हणाले की, मराठा समाजाने अनेक नेत्यांना राजकीय बळ दिले, त्यांच्या विजयासाठी जीवाचे रान केले. मात्र, आता त्याच समाजाच्या तरुणांचे राजकीय नुकसान करण्याचा प्रयत्न होत आहे. मंत्री संदीपान भुमरे यांचा उल्लेख करत त्यांनी, “समाजाने तुमच्यासाठी एवढे केले, त्याची ही परतफेड आहे का?” असा सवाल उपस्थित केला.
यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही आरोप करत, “आधी प्रमाणपत्रे द्या आणि नंतर ती रद्द करा, असा सल्ला देण्यात आला होता,” असा दावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मौनही संशयास्पद असल्याचे सांगत त्यांनी, “ते बोलत नाहीत म्हणजे या सर्वाला त्यांची मूकसंमती आहे,” असा आरोप केला.
शिवसेना नेते तथा मंत्री संजय सिरसाट यांच्या भूमिकेवरही जरांगे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सिरसाट यांनी केलेल्या कृतीमागेही एकनाथ शिंदे यांचाच कट असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, शिंदे त्यांच्या नेत्यांच्या बैठका घेऊन मराठा समाजाविरोधात नियोजन करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
जरांगे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही उल्लेख करत, “आज त्यांना चांगले म्हणण्याची वेळ आली आहे,” असे वक्तव्य केले. शिंदे गटाच्या गद्दारीचा डाग आपण पुसला, मात्र आता मराठा समाजातील तरुणांचे राजकीय नुकसान केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
आपली भूमिका अधिक आक्रमक करताना जरांगे म्हणाले, “मी कुणालाही घाबरणारा नाही. गरज पडली तर तुरुंगात जाण्यासही तयार आहे. पण मराठा समाजावर अन्याय करणाऱ्यांना सोडणार नाही.” त्यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना राजकीयदृष्ट्या पराभूत करण्याचा इशाराही दिला.
मंत्रालयातूनच कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याचे काम सुरू असल्याचा गंभीर आरोप करत जरांगे यांनी सरकारला थेट जबाबदार धरले. मराठा समाजाच्या हक्कांवर गदा आणणारे कोणतेही पाऊल सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मराठा आरक्षण आंदोलन सुरू झाल्यापासून मनोज जरांगे पाटील यांनी प्रथमच एकनाथ शिंदे यांच्यावर इतक्या तीव्र शब्दांत हल्लाबोल केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात या वक्तव्याची मोठी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या आरोपांवर शिंदे किंवा राज्य सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading