ओएसडीच्या सांगण्याने नव्हे तर लिपिकाने स्वतःसाठी घेतली लाच
संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची झिरवाळ यांची ग्वाही
मुंबई : अन्न व औषध प्रशासनातील लिपिक राजेंद्र ढेरंगे याने आपल्या विशेष कार्य अधिकाऱ्याच्या मागणीनुसार नव्हे तर स्वतःसाठी लाच स्वीकारण्याचा जबाब दिला असल्याचा दावा अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या प्रकारांची आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. लाच प्रकरणाबाबत आपल्या राजीनाम्यची मागणी केली जात असली तरी देखील मंत्रीपदावर कोणाला ठेवायचे आणि कोणाला काढायचे, याचे अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचे आहेत, असेही झिरवाळ यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाबाबत अद्याप आपली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.
राजेंद्र ढेरंगे हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या गोपनीय अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जोशी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. ढेरंगे हा अन्न व औषध प्रशासन विभागात अन्न व नागरी पुरवठा विभागातून प्रतिनियुक्तीवर आला असून त्याला पुन्हा आपल्या मूळ विभागात पाठवण्यासंबंधी सामान्य प्रशासन विभागाला कळवले असल्याचेही झिरवाळ यांनी सांगितले.
अन्न व औषध प्रशासन विभागात लाच मागितल्याच्या अनेक तक्रारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागामध्ये गेल्यामुळेच धाड घालण्यात आल्याचा झिरवाळ यांनी इन्कार केला. या विभागात औषध दुकानांचे परवाने, अपिलाची सुनावणी, निलंबन अथवा निलंबन मागे घेण्याच्या कारवाया नियमानुसार व नियमितपणे सुरू आहेत. या विभागात कोणालाही लाच देण्यासाठी जबरदस्ती केली जात नाही, असा दावाही झिरवाळ यांनी केला.
