पुणे शहरातील शहरी गतिशीलतेसाठी अल्पकालीन उपाय, बिग डेटा व TOD आधारित धोरणावर भर
पुणे : पुणे शहरातील शहरी गतिशीलता (Urban Mobility) अधिक सक्षम, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन आज पुणे महानगरपालिकाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले. महापालिका आयुक्त मा. श्री. नवल किशोर राम यांच्या निर्देशानुसार आयोजित या कार्यशाळेत महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या कार्यशाळेला मा. महापौर श्रीमती मंजुषा दीपक नागपुरे, मा. उपमहापौर श्री. परशुराम वाडेकर, सभागृह नेते श्री. गणेश बिडकर तसेच विरोधी पक्षनेते श्री. निलेश निकम यांनी उपस्थिती दर्शवून आपले विचार मांडले. येत्या काळात पुणेकरांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद व सुलभ करण्यासाठी प्रशासनाने ठोस आणि तातडीचे निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महापौर श्रीमती मंजुषा नागपुरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पुणे शहर कोंडीमुक्त करण्यासाठी महापालिकेकडे उपलब्ध साधनसंपत्तीचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. तात्काळ राबवता येणाऱ्या अल्पकालीन उपायांवर भर देत नागरिकांना सार्वजनिक वाहतूक, बस व मेट्रोचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्यक्ष रस्त्यांवर पाहणी करून समस्या नोंदविण्यासाठी ‘जागल्या’ नेमण्यासारखे उपक्रम राबविले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी सांगितले की, सन २०२६ मध्ये रस्ते विकास व वाहतूक सुधारणा प्रकल्प इतर शासकीय विभागांच्या समन्वयाने राबविण्यात येतील. वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी बिग डेटा (Big Data) चा वापर करून ट्रॅफिक पॅटर्न, गर्दीची ठिकाणे आणि अडचणी ओळखल्या जातील. तसेच भविष्यातील भांडवली खर्चिक प्रकल्प दीर्घकालीन आणि रणनीतीपूर्वक राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यशाळेत शहर अभियंता श्री. अनिरुद्ध पावसकर यांनी आगामी काळातील वाहतूक सुधारणा उपाययोजनांचे सविस्तर सादरीकरण केले. मुख्य अभियंता श्री. राजेश बनकर आणि प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता श्री. दिनकर गोजारे यांनी एका वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या उपयोजनांची माहिती दिली.
पोलीस अतिरिक्त आयुक्त श्री. मनोज पाटील यांनी वाहतूक शिस्त, अंमलबजावणी आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराबाबत मार्गदर्शन केले. याचवेळी IITM संस्थेच्या प्रतिनिधींनी पुणे शहरातील हवेच्या गुणवत्तेबाबत (Air Quality) महत्त्वपूर्ण माहिती सादर केली.
कार्यशाळेमध्ये ‘स्वच्छ हवा’ (Clean Air) या विषयावर विशेष भर देण्यात आला. खासगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतूक, बस व मेट्रोचा वापर वाढवल्यास प्रदूषणात लक्षणीय घट होऊ शकते, यावर सखोल चर्चा झाली. तसेच जे. एम. रोड, एफ. सी. रोड यांसारखे रस्ते पादचारी, सायकलस्वार व सार्वजनिक जीवनासाठी अनुकूल ‘स्ट्रीट्स’ म्हणून विकसित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
दुपारच्या सत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी शहरी वाहतूक व्यवस्थेतील सर्वोत्तम पद्धती मांडल्या. CRRI, Oasis Designs, Design Point (अहमदाबाद) तसेच RKD संस्थेच्या प्रतिनिधींनी अंमलबजावणीयोग्य उपाययोजनांचे अनुभव शेअर केले.
NIUA, नवी दिल्ली या संस्थेमार्फत UrbanShift उपक्रमांतर्गत पुणे महानगरपालिकेसोबत सुरू असलेल्या Transit Oriented Development (TOD) विषयक कामाची माहिती देण्यात आली. स्टेशन एरिया प्लॅन तयार करणे, TOD मार्गदर्शक तत्त्वे विकसित करणे आणि शिवाजीनगर मेट्रो स्टेशन परिसरात पायलट प्रकल्प राबविणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.
वाहतूक नियोजक श्री. निखिल मिजार यांनी TOD संदर्भात पुण्यातील बांधकाम व्यावसायिक व वास्तुविशारदांसोबत संवाद साधला. या चर्चेत मेट्रो स्टेशन परिसरातील विकास व पुनर्विकासावर सविस्तर विचारमंथन झाले. CREDAI, MBVA, NAREDCO, AESA आणि IIA या संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
कार्यशाळेदरम्यान विविध हितधारकांनी दिलेल्या सूचना स्टेशन एरिया मोबिलिटी प्लॅनमध्ये समाविष्ट केल्या जाणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य अभियंता (प्रकल्प) श्री. दिनकर गोजारे आणि वाहतूक नियोजक श्री. निखिल मिजार यांनी केले.
अशा प्रकारच्या कार्यशाळा नियमितपणे आयोजित करून सर्व अभियंत्यांनी त्याचा लाभ घ्यावा व येत्या वर्षातील महापालिकेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
