खपवून घेतली जाणार नाही इतर पक्षीय नेत्यांची लुडबूड; हसन मुश्रीफ यांचा इशारा
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे. या पक्षात घेतले जाणारे निर्णय आणि घडणाऱ्या घडामोडी यावर अन्य पक्षातील नेत्यांनी लुडबूड करणे अथवा अनावश्यक विधाने करणे हे या पुढे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेससाठी पवार गटाचे ज्येष्ठ नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे आम्ही शोकसागरात बुडालेले असताना ज्यांचा पक्षाशी संबंध नाही अशा इतर पक्षाच्या नेत्यांकडून आम्हाला डिवचण्याचे प्रयत्न का केले जात आहेत, हेच कळत नाही, असेही मुश्रीफ म्हणाले.
पक्षाच्या हितासाठी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कार्यक्षमतेने काही निर्णय घेतले असतील तर त्यांना खलनायक ठरवण्याचे कारणच काय, असा सवालही मुश्रीफ यांनी केला. या दोन्ही नेत्यांनी दीर्घकाळ अजित पवार यांच्याबरोबर काम केले आहे. अजित पवार यांच्या पश्चात कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून या दोघांनी विधिमंडळ पक्षाची बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीत विधिमंडळ पक्षाची सूत्र सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवली तर त्यात त्यांची काय चूक आहे, असा प्रश्नही त्यांनी केला.
