बांगलादेशी घुसखोरांच्या नावाची काळी यादी तयार करण्याचे आदेश
मुंबई: प्रतिनिधी
आतापर्यंत उघडकीला आलेल्या बांगलादेशी घुसखोरांच्या नावाची काळी यादी तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिले आहेत. नव्याने उघडकीला आलेल्या घुसखोरांच्या नावाचा समावेश यादीत करून ती अद्ययावत ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
काळ्या यादीत नावे असलेल्या घुसखोरांकडे शिधापत्रिका असतील तर त्या मिळवण्यासाठी त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी. बनावट आणि बेकायदेशीर कागदपत्र रद्द करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत. ही कागदपत्र त्यांनी कशी मिळवली त्याची पाळीमुळे खणून काढावी, असे आदेशही पोलिसांना देण्यात आले आहेत.
शिधापत्रिकेद्वारे अथवा अन्य मार्गाने मिळणाऱ्या नागरी सुविधा रोखणे शक्य व्हावे यासाठी नव्याने उघड होणाऱ्या घुसखोरांचा समावेश तातडीने यादीत करण्यात यावा. त्याची माहिती विभागीय व जिल्हाधिकारी कार्यालयांना देण्यात यावी, असे आदेशही पोलिसांना देण्यात आले आहेत.
शिधापत्रिका देण्याची प्रक्रिया अधिक काटेकोर
नव्याने शिधापत्रिका देताना केवळ लोकप्रतिनिधी अथवा माननीयांच्या शिफारसीवरून त्या देण्यात येऊ नयेत. शिधापत्रिकेसाठी आवश्यक सर्व कागदपत्र दाखल करून घेण्यात यावीत. तसेच या कागदपत्रांच्या सत्यतेची बारकाईने पडताळणी करण्यात यावी, असे आदेशही नागरी पुरवठा विभागाच्या प्रशासनाला देण्यात आले आहेत. या सर्व उपाययोजनांमुळे घुसखोर बेकायदेशीरपणे मिळवत असलेल्या सुविधा बंद होऊन त्यांच्या नाड्या आवळल्या जाणार आहेत.
