Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

देवेंद्र फडणवीस चाणाक्ष राजकारणी  – रवींद्र धंगेकर

पुणे: प्रतिनिधी

मित्राला धरून काय बसता, जैन मुनीनी दिलेल्या शापातून मुक्त व्हायचे असेल तर त्यांची मालमत्ता त्यांना परत देऊन टाका, असा सल्ला माजी आमदार व शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना दिला आहे.

जैन बोर्डिंगची मालमत्ता हडपणाऱ्यांचा सर्वनाश होईल, असा शाप तळमळीने बोलणाऱ्या जैन धर्मगुरूंनी दिला आहे. अशावेळी मोहोळ यांनी मित्र म्हणत असलेल्या बांधकाम व्यावसायिक विशाल गोखले यांचे हित न पाहता संबंधित मालमत्ता परत करून टाकावी आणि गुरूंच्या छापातून मुक्त व्हावे, असे धंगेकर यांनी नमूद केले आहे.

काही विकृत लोक मलिदा खाण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना मदत करतात. आपले अधिकार आणि शासकीय यंत्रणा वापरून मालमत्ता बांधकाम व्यावसायिकांच्या घशात घालतात. जैन बोर्डिंग मालमत्ता व्यवहार प्रकरणी मोहोळ यांनी हाच भीम पराक्रम केला आहे, असा टोलाही रवींद्र धंगेकर यांनी लगावला.

मोहोळ यांनी आपल्याला कायद्याची भीती दाखवू नये. माझ्यावर एकही गुन्हा दाखल नाही. मोहोळ यांच्यावर मात्र पाच सात गुन्हे दाखल आहेत. दलित बांधवांना त्रास दिल्याचा गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल आहे, असा आरोपही त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस चाणाक्ष राजकारणी

शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुरलीधर मोहोळ यांची बैठक झाल्याची माहिती मिळत आहे. यात जैन बोर्डिंग मालमत्तेचा विषय नक्कीच चर्चेला आला असेल. जैन समाज नेहमीच भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी राहिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चाणाक्ष राजकारणी आहेत. त्यामुळे त्यांनी या प्रकरणात मोहोळ यांना चार शब्द सुनावले असतील, असेही धंगेकर म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading