Saturday, October 31, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

एमपीएससी पेपरफुटीविरोधात अभिजीत दीपके यांचे राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

 

मुंबई  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या प्रकरणावरून राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत असतानाच कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या राजीनाम्याची मागणी मान्य न झाल्यास विद्यार्थ्यांशी चर्चा करून राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

कॉकरोच जनता पार्टीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात दीपके सहभागी होणार आहेत. काही एमपीएससी विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील वाळुज येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आंदोलनात सहभागी होण्याची विनंती केली होती. त्यानंतर दीपके यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत भूमिका स्पष्ट केली.
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात आयोगाच्या अध्यक्ष आणि सचिवांनी राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी पक्षाने केली आहे. २४ सप्टेंबरपर्यंत ही मागणी पूर्ण न झाल्यास विद्यार्थ्यांशी चर्चा करून राज्यभर दौरा काढण्यात येईल, असे पक्षाने स्पष्ट केले आहे.

यापूर्वी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन केल्यानंतर दीपके यांनी महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवरून राज्य सरकारला लक्ष्य केले होते. आता एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. एका व्हिडीओ संदेशातून त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत, राजीनामे होईपर्यंत त्यांच्या आंदोलनात साथ देण्याची भूमिका मांडली होती.
दरम्यान, एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुख या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर पेपरफुटी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आर्थिक व मानसिक अडचणींचा मुद्दा अधिक तीव्रतेने पुढे आला. प्रथमेशवर सुमारे अडीच लाख रुपयांचे कर्ज होते. पावसाअभावी शेतीचे नुकसान झाल्याने त्याच्या कुटुंबावर आर्थिक संकट निर्माण झाले होते. कुटुंबातील तो एकमेव कमावता सदस्य होता.

प्रथमेशच्या परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर दीपके यांनी धाराशिव येथे जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि मागण्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय त्यानंतर घेण्यात आला.
एमपीएससी परीक्षेतील कथित गैरप्रकारांची चौकशी, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची मागणी आता आंदोलनाच्या केंद्रस्थानी आली आहे. २४ सप्टेंबरनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे पक्षाने सांगितले आहे.

Leave a Reply