Wednesday, September 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनारोधात सदावर्ते आक्रमक; ‘कायद्याची तटबंदी उभारण्याचा इशारा

मुंबई : मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम असल्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांच्या आंदोलनाला कायदेशीर मार्गाने विरोध केला जाईल, असा इशारा सदावर्ते यांनी दिला.
कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक करत सदावर्ते म्हणाले की, कायद्याची कठोर अंमलबजावणी झाल्याशिवाय काही जण ऐकत नाहीत. त्यामुळे आंदोलनाला कायदेशीर पातळीवर आव्हान देण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला. यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात येणार असून, जयश्री पाटील ही तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवाचा काळ सुरू असल्याने शहरातील उत्सव आणि दैनंदिन जनजीवन विस्कळीत होणार नाही, याची प्रशासनाने काळजी घ्यावी, असेही सदावर्ते यांनी म्हटले. आंदोलनामुळे मुंबईतील वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी पोलिसांनी याबाबत कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी केली.
मनोज जरांगे पाटील हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. मुंबईला अस्थिर करण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असे सदावर्ते यांनी स्पष्ट केले. मुंबई बंद करण्याची ताकद बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर कोणाकडेही राहिलेली नाही, असेही त्यांनी नमूद केले.

जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना सदावर्ते यांनी त्यांच्यावर ‘दुकानदारकी’ आणि ‘सिंडिकेट पद्धतीने दुकानदारी’ केल्याचा आरोप केला. त्यांच्या आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित कोणालाही कायदेशीर कारवाईपासून सुटका मिळणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्याच्या निर्णयावर जरांगे पाटील ठाम आहेत. त्यामुळे आगामी काळात प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमधील संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading