Wednesday, September 16, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

श्रीमंत ‘दगडूशेठ’ हलवाई गणपती ट्रस्टच्या ‘प्रेम मंदिर’ सजावटीच्या विद्युत रोषणाईचे उद्घाटन

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते विद्युत रोषणाईचे उद्घाटन

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३४ व्या वर्षी गणेशोत्सवात वृंदावन मधील प्रेम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद््घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले.

यावेळो ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, विश्वस्त रोहित लोंढे, पराग वांबुरे, राजेंद्र गावडे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री राधा-कृष्णांप्रती असलेले दिव्य प्रेम, भक्तीचा वास असलेल्या प्रेम मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात साकारण्यात आली असून भाविकांकरिता प्रेमभावनेत तल्लीन करणारा आध्यात्मिक प्रवास यानिमित्ताने घडविण्यात येत आहे.  नानाविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या मंदिराची प्रतिकृती सुमारे १०० फूट इतकी आहे.

प्रतिकृतीच्या रचनेत संगमरवरी वास्तुकलेपासून प्रेरित भव्य दर्शन भाग आहे. उत्तर भारतीय मंदिराच्या पारंपरिक रचनेचे प्रतिबिंब दर्शवणारी कलाकुसर केलेले स्तंभ आणि घुमट, रासलीला, गोवर्धन लीला, झुला यांसारख्या कृष्णलीला दर्शविणारे शिल्पपट देखील आहेत. शोभिवंत फुलांची सजावट, पवित्र शुभचिन्हे आणि आकर्षक विद्युतरोषणाईमुळे सायंकाळनंतर हे मंदिर उजळून निघाले.

प्रारंभी बुधवार चौकामध्ये भव्य कमान साकारण्यात आली असून त्यावर आकर्षक नक्षीकाम केले आहे. मुख्य प्रतिकृतीच्या दोन्ही बाजूंना असलेल्या रनिंग मांडवावर कृष्णलीलेतील विविध प्रसंग साकारण्यात आले आहेत. मंदिराच्या वर दर्शनी भागात राधा-कृष्णाची भव्य मूर्ती देखील आहे. प्रतिकृतीचा आकार १२० फूट लांब, ९० फूट रुंद आणि १०० फूट उंच आहे. यामध्ये अनेक भव्य खांब असून विविध मूर्ती देखील आहेत. गाभारा व मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रींचे दर्शन घेता येईल. कलादिग्दर्शक नितेश कुमार आणि ग्लिटरी इव्हेंट्स प्रा. लि. यांनी मंदिराच्या प्रतिकृतीचे काम केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading