मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर झालेल्या ‘एमआरएफ इंडियन नॅशनल रेसिंग चॅलेंज’ स्पर्धेत पुण्याच्या सार्थक चव्हाण याला तिहेरी मुकूट !!
रविवारी झालेल्या या शर्यतीमध्ये ‘पोल पोझिशन’वरून सुरूवात करताना सार्थकला सुरूवातीला थोडा अडथळा आला, ज्यामुळे किशोरवयीन रायडर आणि त्याचा पेट्रोनास टिव्हीएस रेसिंग संघातील सहकारी रक्षित दवे याला आघाडी घेण्याची संधी मिळाली. या दोघांनी शेवटच्या लॅपपर्यंत आपापले स्थान टिकवून ठेवले. मात्र शेवटच्या लॅपमध्ये सार्थकने ‘टर्न-४’वर रक्षितला मागे टाकले आणि विजय मिळवला. त्याच्यामागे हैदराबादच्या राहिल पिल्लरीसेट्टी याने तिसरे स्थान मिळवले. या गटाच्या दोन्ही शर्यतीमध्ये सार्थकने आपला अव्वल क्रमांक संपादन केला. स्पर्धेच्या पात्रता फेरीमध्ये सार्थक याला भाग घेता आला नव्हता त्यामुळे सार्थकने पहिल्या रेसमध्ये शेवटच्या क्रमांकावरूनही सुरूवात करत अव्वल क्रमांक मिळवला.
पेट्रोनास टिव्हीएस रेसिंग वन-मेक चॅम्पियनशीप स्पर्धेत सार्थक चव्हाणने आपली विजयांची मालिका कायम राखत तीन फेऱ्यांच्या ‘इलेक्ट्रिक आरटीई’ या गटात अव्वल स्थान मिळवून तिहेरी मुकूट पटकावला. बेंगळुरूचा चिरंत विश्वनाथ आणि सॅव्हियन साबू यांनी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसरे स्थान मिळवले.
याआधी एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप (एआरआरसी) स्पर्धेच्या ‘टीव्हीएस रेसिंग इंटरनॅशनल चॅम्पियनशीप’ या श्रेणीमध्ये मलेशियातील मौसमाच्या पहिल्याच फेरीमध्ये सार्थक ‘पोडीयम विजेता’ ठरला होता. त्यानंतर मे महिन्यामध्ये थायलंडमधील बुरिराम येथील ‘चांग इंटरनॅशनल सर्किट’ येथे झालेल्या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत विजेतेपदाचा प्रमुख दावेदार ठरलेल्या सार्थक याने आपल्या कामगिरीने आपला दावा ‘सार्थ’ करून दाखविला होता.
स्पर्धेचा निकालः (सर्व सहा फेऱ्यांच्या शर्यती)ः
सुपर स्पोर्ट ३०१-४०० सीसी ओपन (शर्यत-२)ः १. सार्थक चव्हाण (पुणे, पेट्रोनास टीव्हीएस रेसिंग) (१० मि. ५९.५६५ सेकंद); २. रक्षित दवे (चेन्नई, पेट्रोनास टीव्हीएस रेसिंग, ११.००.०५९ मि.); ३. राहिल पिल्लारीसेट्टी (हैदराबाद, आरएसीआर कॅस्ट्रोल पॉवर१; ११.००.५९० मि.);
पेट्रोनास टिव्हीएस रेसिंग वन-मेक चॅम्पियनशीपः
इलेक्ट्रिक आरटीई (३ फेऱ्या)ः १. सार्थक चव्हाण (पुणे, ५.३९.८०० मि.); २. चिरंग विश्वनाथ (बेंगळुरू, ५.४१.६२९ मि.); ३. सेव्हियन साबू (बेंगळुरू, ५.४१.९१० मि.);
फोटो ओळीः फोटो १ः सुपर स्पोर्ट ३०१-४०० सीसी ओपन शर्यतीतील विजेता सार्थक चव्हाण (मध्यभागी). (डावीकडे) रक्षित दवे, (उजवीकडे) राहिल पिल्लारीसेट्टी.
फोटो २ः पेट्रोनास टिव्हीएस रेसिंग वन-मेक चॅम्पियनशीप शर्यतीतील विजेता सार्थक चव्हाण (मध्यभागी). चिरंग विश्वनाथ (डावीकड). सेव्हियन साबू (उजवीकडे).
