Saturday, October 31, 2026
Latest NewsMAHARASHTRA

पार्किंगच्या वादातून तरुणाची कारखाली चिरडून हत्या; नेरुळमध्ये चौघांचा धुमाकूळ

 

नवी मुंबई  : गाडी पार्क करण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान एका तरुणाच्या हत्येत झाल्याची धक्कादायक घटना नेरुळमधील शिरवणे परिसरात घडली. मिनीमहल हॉटेलसमोर झालेल्या वादानंतर चार जणांनी क्रेटा कारने एका ३३ वर्षीय तरुणाला दोनदा धडक देऊन गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी पुन्हा घटनास्थळी येऊन दोघा तरुणांवर हॉकी स्टिकने हल्ला केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील चौघेही आरोपी फरार असून नेरुळ पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

मृत तरुणाचे नाव रणजीतसिंग दलजीत शेरगिल (३३) असे आहे. या प्रकरणी आशुतोष मोरजकर (३३, रा. जुईनगर) याने पोलिसांत तक्रार दिली आहे. आशुतोष हा बेलापूर येथील एका हॉटेलमध्ये काम करतो.

शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आशुतोष आणि त्याचा मित्र मुबिन हे दोघे शिरवणे येथील मिनीमहल हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले होते. मुबिनने आपली दुचाकी हॉटेलसमोर पार्क केली होती. जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर तो सिगारेट ओढण्यासाठी बाहेर आला. त्याचवेळी एमएच-१२-यूसी-७७५५ क्रमांकाच्या क्रेटा कारमधून चौघे जण तेथे आले.
आरोपींनी हॉटेलसमोर पार्क केलेल्या काही दुचाकींना लाथा मारून त्या खाली पाडल्याचा आरोप आहे. याबाबत मुबिनने जाब विचारला असता चौघांनी त्याच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. हा प्रकार पाहून आशुतोषने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यालाही शिवीगाळ करत वाद वाढवला.

दरम्यान, परिसरातील काही नागरिकांनी हस्तक्षेप करून भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी आशुतोष आणि मुबिन यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर ते कारमध्ये बसून निघून गेले.
काही वेळाने पुन्हा घटनास्थळी आलेल्या आरोपींनी मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या रणजीतसिंग शेरगिल यांच्या दिशेने कार घातल्याचा आरोप आहे. कारने धडक दिल्यानंतर चालकाने वाहन मागे घेतले आणि पुन्हा रणजीतसिंग यांच्या अंगावर चढवले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर आरोपी कारसह पसार झाले. मात्र, काही वेळाने त्यांच्यापैकी एक जण हॉकी स्टिक घेऊन पुन्हा घटनास्थळी आला आणि आशुतोषवर हल्ला केला. त्यानंतर चौघेही आरोपी कारमधून फरार झाले.

Leave a Reply