Wednesday, September 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

जरांगेंच्या बहुतांश मागण्या मान्य, उर्वरित मुद्द्यांवर संविधानिक मार्गानेच निर्णय : फडणवीस

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या बहुतांश मागण्यांवर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असून, उर्वरित काही मागण्या न्यायालयीन प्रक्रियेत किंवा शासनाच्या विविध स्तरांवर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन कोणताही निर्णय घेता येणार नसून, संविधानिक मार्गानेच या मागण्यांवर तोडगा काढावा लागेल, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सरकारने चर्चेची दारे बंद केलेली नसून, राज्यघटनेनुसार आणि कायद्याच्या चौकटीत जे शक्य आहे ते करण्याची सरकारची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“काही मागण्या न्यायालयात आहेत, तर काही विविध टप्प्यांवर आहेत. त्या मान्य करण्यासाठी संबंधित न्यायालयीन आणि संविधानिक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. कायद्याच्या बाहेर जाऊन कोणतीही गोष्ट करता येणार नाही,” अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली.

सरकारने आतापर्यंत जरांगे यांच्या मागण्यांबाबत खुल्या मनाने विचार केला असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन झाल्यास गणेशभक्तांना आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे सणाच्या काळात आंदोलन करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील प्रस्तावित आंदोलनाबाबत आपल्या कार्यक्रमात बदल केला आहे. यापूर्वी समर्थकांसह मुंबईत येण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र, आता आपण एकटेच मुंबईत येणार असून समर्थकांनी सोबत येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आपल्या आंदोलनाला अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. सरकारच्या या भूमिकेला जशास तसे उत्तर देण्यासाठी आपल्यालाही वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल, असे त्यांनी म्हटले.
आपण आता एकटेच मुंबईत येत असल्याने तरी आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी दिली जाणार का, असा सवालही जरांगे यांनी राज्य सरकारला केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading