महिला डॉक्टरने केलेल्या तक्रारींची पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर त्यांचा जीव वाचला असता – अंबादास दानवे
सातारा: आपल्यावर येणारा दबाव आणि होणारा छळ याबाबत फलटण येथील महिला डॉक्टरने केलेल्या तक्रारींची पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर त्यांचा जीव वाचला असता, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आपल्या खोलीत केलेल्या आत्महत्येच्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या महिला डॉक्टरांनी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून त्यात दोन पोलीस अधिकाऱ्यांची नावे नमूद केली आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि शिपाई प्रशांत बनकर यांना निलंबित करण्यात आले आहे. उपनिरीक्षक बदने यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केला तर बनकर यांनी आपला मानसिक छळ केला, असे संबंधित महिला डॉक्टरांनी नमूद केले आहे.
वैद्यकीय अहवाल बदलण्यासाठी आपल्यावर येत असलेल्या दबावाबाबत या महिला डॉक्टरांनी वारंवार पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. तत्कालीन पोलीस निरीक्षक महाडिक यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्याचवेळी दखल घेतली गेली असती तर डॉक्टरांचा प्राण वाचला असता, असा दानवे यांचा दावा आहे.
मोठ्या प्रमाणावर राजकीय दबावाचाही आरोप
या संपूर्ण प्रकरणात संबंधित महिला डॉक्टर आणि पोलिसांवरही मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाव असल्याचा आरोपही दानवे यांनी केला आहे. आमदार सचिन कांबळे यांनी या प्रकरणात वारंवार दबाव आणण्याचा त्यांचा दावा आहे. त्याचप्रमाणे अभिजीत निंबाळकर हे नाव देखील या प्रकरणात वारंवार येत आहे. माजी खासदाराच्या स्वीय सचिवाकडून देखील या प्रकरणात दबाव आणला गेला आहे, असे आरोप दानवे यांनी केले. या प्रकरणाची कसून चौकशी करून दोषींना फासावर लटकवावे, अशी मागणी देखील त्यांनी केली.
