खासदार फुटीच्या चर्चांमध्ये ठाकरे गटाची धावपळ; पत्रकार परिषदेत प्रश्नावरून गदारोळ
नवी दिल्ली : शिवसेना (ठाकरे गट)च्या काही खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले असताना पक्षाच्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नावरून मोठा गदारोळ झाला. पक्ष सोडण्याच्या चर्चेत असलेले खासदार उद्धव ठाकरे वेळ देत नसल्याची नाराजी व्यक्त करत असल्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारताच पक्षाचे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
खासदार अरविंद सावंत यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारालाच उलट सवाल करत, ही माहिती कुठून आली आणि असा दावा करणाऱ्या खासदाराचे नाव जाहीर करण्याची मागणी केली. त्यांनी या सर्व चर्चा अपप्रचाराचा भाग असल्याचा आरोप केला. या वादानंतर पत्रकार परिषद लवकर आटोपती घेण्यात आली.
यानंतर पक्षाचे नेते अनिल देसाई यांनी भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, अलीकडेच खासदारांशी चर्चा झाली असून त्यांनी पक्षासोबत असल्याचा विश्वास दिला आहे. अद्याप कोणत्याही खासदाराने पक्ष सोडण्याचा निर्णय कळवलेला नाही. त्यामुळे पक्षाला आपल्या खासदारांवर विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले.
तथापि, माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पक्षाने कायदेशीर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. संभाव्य घडामोडी लक्षात घेऊन कॅव्हेट दाखल करण्यासह अन्य पर्यायांचाही विचार सुरू असल्याचे देसाई यांनी सांगितले.
दरम्यान, लोकसभा अध्यक्षांकडे कोणत्याही नव्या संसदीय गटाला मान्यता देण्यापूर्वी पक्षाची बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी करणारे पत्रही देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
या सर्व घडामोडींमध्ये स्पष्टता यावी यासाठी ठाकरे गटाने उद्या आपल्या सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी खासदारांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यानंतर पक्षातील नेमकी स्थिती आणि फुटीच्या चर्चांचे वास्तव समोर येण्याची शक्यता आहे.
