पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाश्वत गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळांचे आयोजन करून टाटा पॉवरने राबविला हरित उपक्रम
पुणे : भारताची सर्वात मोठी एकत्रित वीज कंपनी टाटा पॉवर ने शाश्वत विकास आणि समाजाभिमुख उपक्रमांबद्दलची आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित करत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळा विविध प्रकल्प, ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स केंद्रांसह आसपासच्या समाजघटकांमध्ये आयोजित केल्या.
महाराष्ट्रात गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू असताना, टाटा पॉवरने नैसर्गिक, रसायनमुक्त आणि बियाणे रोपण असलेल्या मूर्तींचा प्रचार करून उत्सव हरित करण्याचा मार्ग दाखवला आहे. या कार्यशाळांदरम्यान ख्यातनाम कलाकारांच्या मार्गदर्शनाखाली 250 हून अधिक शाश्वत गणेशमूर्ती हाताने साकारल्या गेल्या. या मूर्ती विसर्जनानंतर पाण्यात सहज विरघळतात आणि त्यामधील बियाण्यांपासून रोपे उगवतात. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण न होता जिवंत हरित वारसा मागे राहतो.
हा उपक्रम त्याच्या सर्वसमावेशक सहभागामुळे विशेष ठरला. यामध्ये 600 हून अधिक विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला, ज्यामध्ये बहुसंख्य दिव्यांग विद्यार्थी होते. त्यांच्या सर्जनशीलतेने आणि उत्साहाने या मोहिमेला अनोखी उंची मिळाली आणि टाटा पॉवर च्या “सहभागातून सबलीकरण” या ध्येयाला बळ मिळाले. याशिवाय प्रकल्प व ऑपरेशन्स–मेंटेनन्स विभागातील 30 हून अधिक स्वयंसेवकांनी कार्यशाळांना मार्गदर्शन व सहकार्य दिले.
या कार्यशाळांमध्ये समाजातील विविध स्तरांतील लोकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला – पोलीस अधिकारी, वन विभागाचे प्रतिनिधी, सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शालेय विद्यार्थी – हे सर्वजण एकत्र येऊन गणेशोत्सव अधिक जबाबदार पद्धतीने साजरा करण्यासाठी सहभागी झाले. अच्चेगाव, अक्कलकोट, खंडके, सुपा, जेवळी आणि कोरल या अनेक ठिकाणी या कार्यशाळा पार पडल्या, ज्यामुळे या उपक्रमाचा विस्तार आणि प्रभाव विविध भागांपर्यंत पोहोचला.
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याच्या या प्रयत्नातून टाटा पॉवर ने केवळ हरित आणि शाश्वत उत्सवपद्धतीला चालना दिली नाही, तर समावेशकता, सर्जनशीलता आणि समुदायभावना यांनाही दृढ केले. हा उपक्रम टाटा पॉवर च्या “Sustainable is Attainable” या प्रमुख चळवळीचा भाग आहे. या चळवळीचा उद्देश परंपरा आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा सुंदर संगम घडवून शाश्वत जीवनशैली दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनवणे हा आहे.
