‘एक दिवसाची परवानगी ही आंदोलकांची चेष्टा’ जरांगे पाटील यांनी साधला मुख्यमंत्री फडणवीसवर निशाणा
पुणे: प्रतिनिधी
आझाद मैदान येथे मराठा आरक्षण आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी देणे ही आंदोलकांची चेष्टा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर एक दिवसाची परवानगी देऊ शकतात तर आंदोलनकर्त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचीही परवानगी देऊ शकतात, अशा शब्दात मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
मराठा आरक्षण आंदोलनासाठी मुंबईकडे निघालेल्या जरांगे पाटील आणि हजारो कार्यकर्त्यांनी जुन्नर येथे मुक्काम केला. पावन शिवजन्मभूमीवर जाऊन त्यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. त्यानंतर मराठा आंदोलन मुंबईच्या दिशेने राहणारे.
समाजातील मुलाबाळांच्या भवितव्याकडे लक्ष देऊन मागण्या मागणी करून घेण्यासाठी आपण चर्चा करण्यास कायमच तयार आहोत. त्यासाठी आपण कधीच नाही म्हणालेले नाही. सरकारबरोबर, सरकारच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करण्यास आपण तयार आहोत, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.
… तर बरबाद होईल राजकीय कारकीर्द
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले भरघोस बहुमत मराठा समाजाच्या पाठिंब्याशिवाय मिळालेले नाही.
त्यावेळी समाजाचा पाठिंबा मिळाला. मात्र, आता मराठा समाजाच्या संतापाची लाट जर निर्माण झाली तर तुमची राजकीय कारकीर्दच बरबाद होईल, असा इशाराही जरांगे यांनी दिला.
मिळालेल्या संधीचे सोने करा
आज मुख्यमंत्री फडणवीस यांना आरक्षण प्रदान करून मराठा समाजाचे मन जिंकण्याची संधी आहे. आरक्षण मिळाले तर मराठा समाज फडणवीस यांना कधीही विसरणार नाही. तुमच्या हातून अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही आमचे शत्रू, वैरी नाही. मराठाविरोधी भूमिका सोडा आणि गोरगरिबांचे कल्याण करा. मिळालेल्या संधीचे सोने करा, असा सल्ला देखील जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
