मराठा आरक्षण आंदोलकाचा हृदयविकाराने मृत्यू
जुन्नर मुक्कामी घडली दुर्दैवी घटना
पुणे: प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर मुंबईला निघालेल्या आंदोलकांपैकी एकाचा जुन्नर मुक्कामी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सतीश देशमुख असे या आंदोलकाचे नाव असून ते वडगाव ता. केज, जि. बीड येथील असल्याची माहिती मिळाली आहे.
अंतरवाली सराटी येथून निघालेल्या आंदोलकांनी काल जुन्नर येथे मुक्काम केला. आज सकाळी जरांगे पाटील यांनी शिवनेरीवर भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. याच वेळी जुन्नरमध्ये देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आला. हा झटका तीव्र क्षमतेचा असल्याने त्यांचे निधन झाले.
मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून आरक्षण मिळावे, सगे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्यांसह इतर काही मागण्यांसाठी जरांगे पाटील 29 तारखेपासून आझाद मैदान येथे उपोषण करणार आहेत. या आंदोलनासाठी त्यांच्याबरोबर हजारो कार्यकर्ते मुंबईच्या वाटेवर आहेत.
