विराज जोशी यांनी गायलेले ‘एकचि देव श्री स्वामी समर्थ’ हे गीत रसिकांच्या भेटीला
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे नातू आणि किराणा घराण्याचे आश्वासक युवा गायक विराज जोशी यांनी गायलेले ‘एकचि देव श्री स्वामी समर्थ’ हे भक्तीगीत रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले असून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रविवार दि. २४ ऑगस्ट रोजी यु-टुब वर या गाण्याचे औपचारिक प्रदर्शन झाल्यानंतर आता विराज श्रीनिवास जोशी या यु ट्यूब चॅनलवर ते सर्वांसाठी उपलब्ध असेल.
माझे आजोबा भारतरत्न पं भीमसेन जोशी यांनी अनेक संतरचना गायल्या, मात्र स्वामी समर्थांचा अभंग त्यांनी गायला नव्हता या अभंगाच्या निमित्ताने मी तो पहिल्यांदा गायला असे सांगत विराज जोशी म्हणाले की, “या गीताची संकल्पना अक्षय दाभाडकर यांची असून चार ते पाच वर्षांपूर्वी हे गीत आमच्याकडे आले. मात्र त्या वेळी काही तांत्रिक कारणाने ते करणे झाले नाही. इतक्यातच मला अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाचा लाभ घेता आला आणि त्यानंतर लागलीच हे गाणे करायचा योग जुळून आला. श्री स्वामी समर्थांच्या इच्छेप्रमाणे आता हे गीत रसिकांसमोर सादर करताना आनंद होत आहे.” रसिक आणि स्वामीभक्त या गीताला पसंती देतील अशी खात्री असल्याचा विश्वासही विराज जोशी यांनी व्यक्त केला.
या गीताचे लिखाण डॉ. प्रदीप कार्यकर्ते यांनी केले असून अक्षय दाभाडकर यांनी या गीताला संगीत दिले आहे. पांडुरंग पवार (तबला), अविनाश दिघे (संवादिनी), रईस खान (सतार), पं. अमर ओक, दीपक भानुसे (बासरी), माऊली टाकळकर (टाळ) यांनी साथसंगत केली आहे.
