Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

‘कृष्णकुंज’ मध्ये विराजमान होणार अखिल मंडई मंडळाचे शारदा गजानन

उत्सवाचे १३२ वे वर्ष ; यंदा हलत्या झोपाळ्यावर शारदा गणपती विराजमान होणार

पुणे : अखिल मंडई मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात ‘कृष्णकुंज’ ही आकर्षक सजावट साकारण्यात येणार आहे. यावर्षी हलत्या झोपाळ्यावर शारदा गणपती विराजमान होणार आहेत. सजावटीतील श्री राधाकृष्णाच्या हस्तचित्रित मनमोहक कलाकृती गणेशभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.

अखिल मंडई मंडळाचे उत्सवाचे यंदा १३२ वे वर्ष आहे.  हिरव्यागार जंगलाच्या सान्निध्यात ‘कृष्णकुंज’ ही भव्य सजावट मंडळातर्फे साकारण्यात येणार आहे. तब्बल ९० फूट बाय ६० फूट आकारात सजावट असणार आहे. राजस्थानी शैलीतील ही सजावट असून प्रवेशद्वारावर झोपाळ्यावरील राधा-कृष्ण मूर्ती असेल. महिरप आणि मोरांच्या कलाकृती, कलमकारी शैलीतील श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित मोठी चित्रे भाविकांचे लक्ष वेधून घेतील. याशिवाय ५ ते ६ मोठी झुंबरे देखील लावण्यात येणार आहेत.

दर तीन वर्षांनी  शारदा गजानन झोपाळ्यावर विराजमान होतात. यावर्षी शारदा गजानन झोपाळ्यावर विराजमान होणार असून तो झोपाळा राजस्थानी शैलीने तसेच फुलांनी सजवण्यात येणार आहे.  या सजावटीच्या निर्मितीसाठी तब्बल ४० कारागीर काम करत असून, संपूर्ण कलादिग्दर्शन सुप्रसिद्ध विशाल ताजनेकर यांचे आहे. उत्सव काळात मोरया गोसावी यज्ञ मंडपात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कीर्तन, प्रवचन, भजन, आणि सामूहिक आरती यांसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading