Monday, May 25, 2026
Latest NewsSports

दिल्ली येथे झालेल्या पहिल्या हेबॉल राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या आरव संचेती याला विजेतेपद !!

पुणे : पहिल्या हेबॉल नॅशनल अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या १४ वर्षीय आरव संचेती याने ज्युनिअर गटाचे (१९ वर्षाखालील) विजेतेपद संपादन केले. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वर्षीच सर्वात लहान वयाचा खेळाडू आरव याने विजेतेपद मिळवून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

दिल्ली येथील नॅशनल स्पोर्ट्‌‍स क्लब ऑफ इंडिया येथे झालेली ही हेबॉल स्पर्धा ही क्यु स्पोर्ट्‌‍सच्या पुल या प्रकारामध्ये येते. हेबॉल (पुल क्यु स्पोर्ट्‌‍स) हा क्रीडाप्रकार जगामध्ये अतिशय झपाट्याने लोकप्रिय होणारा खेळ असून भारतामध्ये पहिल्यांदा या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले होते. आरवला स्पर्धेचे अग्रमानांकन होते आणि त्याने संपूर्ण स्पर्धेत तशाच प्रकारचा खेळ केला. अंतिम सामन्यामध्ये आरव याने कर्नाटकच्या करण शेशाद्री याचा ७-३ असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. उपांत्य फेरीमध्ये आरव याने तामिळनाडूच्या ए. अब्दुल सैफ याचा ७-६ असा पराभव केला होता. उपांत्यपुर्व फेरीमध्ये आरव याने गुजरातच्या मौविया ठाकोर याचा ५-३ असा पराभव केला होता.

आरव हा राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्नुकर आणि बिलीयर्डस्‌‍ खेळाडू सचिन संचेती यांचा मुलगा असून आपल्या वडीलांप्रमाणेच त्याने या क्यु स्पोर्ट्‌‍स प्रकारात आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. भारतीय (राष्ट्रीय) सब-ज्युनिअर २०२४ स्नुकर आणि बिलीयर्डस्‌‍ गटात क्रमांक १ तसेच महाराष्ट्र (राज्यस्तरीय) सब-ज्युनिअर गटात क्रमांक १ असे आरवचे मानांकन आहे.

आरव हा सुरी सूर्यनारायणन नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली ॲमानोरा फर्न क्लब येथे सराव करतो. एनआयओएस या खुल्या शालेय अभ्यासक्रमांतर्गत तो सध्या दहावी परीक्षेची तयारी करत आहे. बाहरीन येथील मनामा येथे झालेल्या आयबीएसएफ जागतिक १७ आणि २१ वर्षाखालील स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या भारतीय संघामध्ये पुण्याच्या आरव संचेतीची निवड झाली होती. २०२३ मध्ये झालेल्या आयबीएसएफ जागतिक १७ वर्षाखालील स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेतसुद्धा आरव सहभागी झाला होता. ही स्पर्धा रियाध, सौदी अरेबिया येथे झाली होती.

स्पर्धेचा सविस्तर निकालः
अंतिम सामनाः आरव संचेती (महाराष्ट्र) वि.वि. करण शेशाद्री (कर्नाटक) ७-३;

उपांत्य फेरीः आरव संचेती वि.वि. ए. अब्दुल सैफ (तामिळनाडू) ७-६;
करण शेशाद्री (कर्नाटक) वि.वि. वैभव चढ्ढा (तेलंगणा) ५-३;

उपांत्यपुर्व फेरीः आरव संचेती वि.वि. मौविया ठाकोर (गुजरात) ५-३;
ए. अब्दुल सैफ (तामिळनाडू) वि.वि. ओविस खान (मध्यप्रदेश) ५-०;
करण शेशाद्री (कर्नाटक) वि.वि. जाबेझ नविन कुमार (तामिळनाडू) ५-३;
वैभव चढ्ढा (तेलंगणा) वि.वि. हिरा सिंग (पंजाब) ५-२;

स्पर्धेचे मानांकनः
१. आरव संचेती, २. करण शेशाद्री (कर्नाटक), ३. ए. अब्दुल सैफ (तामिळनाडू), ४. वैभव चढ्ढा (तेलंगणा), ५. मौविया ठाकोर (गुजरात), ६. जाबेझ नविन कुमार (तामिळनाडू), ७. हिरा सिंग (पंजाब), ८. ओविस खान (मध्यप्रदेश).

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading