Friday, June 19, 2026
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

माहितीपटाच्या माध्यमातून उलगडले अरुण सरनाईक यांच्यातील अभिनेता आणि माणूसपणाचे रंग

डॉ. सविता सरनाईक नाईकनवरे निर्मित ‘पप्पा सांगा कुणाचे’ या माहितीपटाचा प्रीमियर संपन्न

पुणे  : चित्रपट आणि रंगभूमी ही दोन्ही माध्यमे आपल्या सशक्त, सहज अभिनयाने आणि रूबाबदार व्यक्तिमत्त्वाने गाजवलेले अभिनेते- गायक म्हणजे अरुण सरनाईक. त्यांच्यातील अभिनेत्याचे आणि माणूसपणाचे विविध रंग त्यांचे कुटुंबीय व सहकलाकारांनी सांगितलेल्या अनेक आठवणींतून आज पुण्यात रसिकांना अनुभविता आले. निमित्त होते त्यांच्या कन्या डॉ. सविता सरनाईक – नाईकनवरे यांची निर्मिती असलेल्या ‘पप्पा सांगा कुणाचे…’ या माहितीपटाची प्रीमियर शो चे.

मराठी नाटय व चित्रपटसृष्टीत गाजलेला एक देखणा चेहरा म्हणून स्वर्गीय अरूण सरनाईक रसिकांना परिचित आहेत. अरुण सरनाईक यांचा जीवनप्रवास सर्वांसमोर यावा, नव्या पिढीला तो समजावा या हेतूने त्यांच्या कन्या डॉ. सविता सरनाईक – नाईकनवरे यांनी आपल्या वडिलांवर ‘पप्पा सांगा कुणाचे…’ या माहितीपटाची निर्मिती केली आहे. या माहितीपटाच्या प्रीमियर प्रसंगी सरनाईक यांच्यासह काम केलेल्या कलाकारांनी, दिग्दर्शकांनी त्यांच्या आठवणींचा पट पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात उलगडला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रसिद्ध रंगकर्मी व चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, प्रसिद्ध रंगकर्मी व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे आणि सुप्रसिद्ध अभिनेते व समाजसेवक नाना पाटेकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माहितीपटाचे दिग्दर्शक डॉ. संतोष पाठारे, डॉ. सविता सरनाईक- नाईकनवरे, रणजीत नाईकनवरे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी अरुण सरनाईक यांचा संपूर्ण जीवनप्रवास, चित्रपट, नाटके, गाणी तसेच दुर्मिळ छायाचित्रे व चित्रफिती असणाऱ्या www.arunsarnaik.com या संकेतस्थळाचे उद्घाटनही मान्यवरांनी केले. सरनाईक व नाईकनवरे कुटंबियांच्या वतीने कोल्हापूरमधील उदयोन्मुख गुणी अभिनेत्याला तसेच कोल्हापूरमधील शास्त्रीय व नाट्यसंगीत क्षेत्रात उत्तम काम केलेल्या गायकाला अरुण सरनाईक शिष्यवृत्ती प्रदान करण्याची घोषणा करण्यात आली.

अरुण सरनाईक यांच्या कन्या डॉ. सविता सरनाईक नाईकनवरे यांनी आपल्या मनोगतातून वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. “चित्रीकरण आणि नाटकांचे दौरे यांतून वेळ मिळाला, की पप्पा थेट घरी येत असत आणि गल्लीच्या टोकापासून माझ्या नावाने हाका मारत असत. भावासह कॅरम खेळताना, मी त्यांना त्रास देत असे पण ते सहन करत. मी लहानपणी टॉमबॉय होते. पत्र्यावर चढून पतंग उडवण्यात अनेकदा आम्ही जखमी व्हायचो, पण ते रागवत नसत. सायकलवरून आम्ही थेट पन्हाळा गाठत असू. पप्पांना वाचनाची आवड होती. रणजीत देसाईंसोबत आम्ही अनेकदा कोबाडला जात असू. आमची माँ अतिशय सुंदर आणि शालीन होती. अपघाती निधनानंतर मावशीच माझी आई झाली. मोठी झाल्यावर मला उमगले, की पप्पा फक्त माझेच नाहीत तर ते रसिकांचे होते आणि नेहमीच राहतील”.

माहितीपटाचे दिग्दर्शक संतोष पाठारे म्हणाले, “आपल्याकडे जुन्या काळी दस्तऐवजीकरणाची प्रथा नसल्याने हा माहितीपट करणे, हे आव्हानात्मक होते. मात्र, उपलब्ध चित्रपट, नाटके, छायाचित्रे आणि आठवणींतून हे आव्हान पेलण्याचा प्रयत्न केला आहे”.

अभिनेते नाना पाटेकर यांनी सहजता हे सरनाईक यांच्या अभिनयाचे वैशिष्ट्य होते आणि अशा अभिनयाचा आदर्श म्हणजे अरुण सरनाईक’, असे उद्गार काढले. “सरनाईक यांनी रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांचा सुवर्णमध्य गाठणारा अभिनय शिकवला”, असेही ते म्हणाले.

डॉ. मोहन आगाशे म्हणाले, “घाशीराम कोतवाल नाटकाच्या प्रयोगाला अरुण सरनाईक येत असत, पण प्रत्यक्ष परिचय सिंहासन चित्रपटाच्या निमित्ताने झाला. अभिनिवेश नसणारा मोठा नट आणि त्यांच्यातील माणूसपण मला अधिक भावत राहिले. सविता यांनी या माहितीपटाच्या रूपाने वडिलांचा नवा परिचय घडवला आहे”.

डॉ. जब्बार पटेल यांनी सिंहासन चित्रपट दिग्दर्शित करतानाच्या अनेक आठवणी सांगितल्या. या माहितीपटात अरुणच्या जीवनाचा उत्तम आढावा मांडला आहे, असे ते म्हणाले. “सिंहासन चित्रपटातील मुख्यमंत्री ही भूमिका अरुण सरनाईक करू शकतील, हे मला विजय तेंडुलकरांनी सुचवले. अरुण हा कोल्हापूर स्कूलच्या परंपरेतील अभिनेता होता. मुख्यमंत्री ही भूमिका साकारताना, त्याने सहज अभिनयाचे दर्शन घडवले. या भूमिकेने त्याला एक वेगळी ओळख मिळाली”, असे त्यांनी सांगितले.

सिंहासन चित्रपटातील अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग मुख्यमंत्र्यांच्या दालनात तसेच मंत्रालयात घडतात. चित्रपटाचे चित्रीकरण वास्तववादी होण्यासाठी तेव्हा मुख्यमंत्री असणाऱ्या शरद पवार यांनी स्वतःचे मुख्यमंत्र्यांचे दालन तसेच मंत्रालयातील काही जागा मोठ्या मनाने आम्हाला चित्रीकरणासाठी त्वरित उपलब्ध करून दिल्या. राजकीय चित्रपटासाठी अशा प्रकारे मंत्रालय, मुख्यमंत्र्यांचे दालन आणि मंत्र्यांचे बंगले प्रथमच चित्रपटात वापरले गेले असावेत. पवारांमुळेच तेव्हाचे मंत्रीमहोदय सुशीलकुमार शिंदे, हशू अडवाणी यांचे बंगलेही चित्रीकरणासाठी मिळू शकले, असे डॉ. पटेल म्हणाले.

अरुण सरनाईक यांना नजरेसमोर ठेवून लिहिल्या गेलेल्या नाटकांत त्यांच्याच नावाची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. या नाटकाच्या प्रयोगाला स्वतः अरुण सरनाईक आले आणि त्यांनी तू उत्तम काम करत आहेस, अशी दाद दिली होती. जे नाटक त्यांच्यासाठी लिहिले गेले होते, त्यांच्या नावाची जी व्यक्तिरेखा होती, ती दुसरा नट साकारत असताना, ते नाटक पाहून, त्या नटाला दाद देण्याचा विलक्षण मोठेपणा, अरुणमधील माणूसपण अधोरेखित करणारा होता अशी आठवण डॉ. पटेल यांनी सांगितली

नील नाईकनवरे यांनी आभार मानले. स्वाती राजे यांनी सूत्रसंचालन केले. रत्ना चौहान यांनी स्वागत केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading